पुणे : वीज कापण्याची भीती दाखवून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला. महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली. वीज बिल अद्ययावत करायचे आहे. बिल अद्ययावत न केल्यास वीज कापली जाईल, अशी बतावणी करुन चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला टीम व्ह्युअर ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. चोरट्याने केलेल्या बतावणीवर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने लिंकद्वारे टीम व्ह्युअर ॲप डाऊनलोड केले.
हेही वाचा >>> पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरिया
ॲप डाऊनलोड केल्यानंतर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून ५० हजार ९९९ रुपये लांबविले. खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे तपास करत आहेत.
नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये
वीज कापण्याची भीती दाखवून गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. महावितरण तसेच सायबर पोलिसांनी चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. वीज कापण्याबाबत धमकावणाऱ्या चोरट्यांच्या बतावणी आणि संदेशाकडे दुर्लक्ष करावे. त्यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.