गजरे करून विकण्याचा त्यांचा व्यवसाय. घोरपडे पेठेतील दहा बाय दहाची खोली हा त्यांचा २५ वर्षांपासूनचा ठिकाणा. खोलीची लाकडे कुजली म्हणून तिच्या दुरुस्तीसाठी २००९ साली घरातील सामान बाहेर काढले. तोच शेजाऱ्याने खोलीला कुलूप लावून ताबा घेतला.. अन् त्यांची परवड सुरू झाली. निबर नोकरशाही, व्यवस्थेतील अनास्था आणि लालफितीचा कारभार यांचे धक्के खात खात सहा वर्षे लोटली. वयाची पासष्टी ओलांडली. आतापर्यंत खोलीसाठी लढणाऱ्या या दाम्पत्याची उमेद संपली असून, ‘मरण्यापूर्वी एकदा तरी खोलीत राहता आलं तरी बास..’ असं म्हणत त्यांनी व्यवस्थेपुढे हात टेकले आहेत!
ही कहाणी आहे, पांडुरंग बनकर आणि त्यांच्या पत्नीची. बनकर यांनीच सांगितलेली.. ते घोरपडे पेठेतील खडकमाळ आळीत १९८६ पासून राहायचे. तिथे दहा बाय दहाची पत्र्याची शेड आणि ओटा असे एकूण दीडशे चौरस फुटांचे क्षेत्र. त्यात नवरा-बायको, दोन मुली, एक मुलगा असा संसार. बनकर रस्त्यावर फुले, हार व गजरे विकायचे. ही खोली नियमित करण्यासाठी त्यांनी १९९४ साली अर्ज केला. तहसील कार्यालयाचे लोक मोजमाप करून गेले. चकरा मारल्या, पण पुढे काहीच झाले नाही. २००७ पासून ते महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी भरत होते. शेडची लाकडे कुजली म्हणून २००९ मध्ये महापालिकेकडून दुरुस्तीसाठी परवानगी घेतली. त्यासाठी घरातील सामान काढले. त्या वेळी शेजाऱ्याने पोलिसांशी संगनमत करून खोलीला कुलूप ठोकले आणि तिचा ताबा घेतला.
पोलिसांचे पालुपद
शेजाऱ्याने न्यायालयात दावा दाखल केला. त्याचा निकालही बनकर यांच्या बाजूने लागला. बनकर सामान घेऊन गेले, पण शेजाऱ्याने दमदाटी करून हाकलून दिले. पोलिसांकडे गेल्यावर एकच पालुपद- खोली नियमित करा, मग आमच्याकडे या! मग सुरू झाल्या शेड नियमित करण्यासाठी फेऱ्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व कागदपत्रे दिली. तिथे ती एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाण्यासाठी कमालीचा वेळ गेला. सततच्या चकरा, विनवण्या, ओळखीच्या लोकांकडून केलेले फोन असे केल्यावर मग कुठे हालचाल झाली.
‘आपल्या अधिकारात जागा नियमित करता येईल,’ असा शेरा जिल्हाधिकारी कार्यालयातून आला, पण जागा शासनाची असल्याने हे प्रकरण मंत्रालयात वन व महसूल विभागाकडे पोहोचले. तिथेही चकरा माराव्या लागल्या, तेव्हा फाइल पुढे सरकली. ‘आता काम झाले,’ असे वाटत होते. पण फाइल माघारी जिल्हाधिकारी कार्यालयात आली. आधी दिलेली माहिती आणि कागदपत्रांची पुन्हा मागणी करण्यात आली. ..
सहा वर्षांनंतर प्रक्रिया पुन्हा पहिल्या टप्प्यावर आली. चकरा मारून आणि पाठपुरावा करून बनकर थकले आहेत. ते हतबल होऊन म्हणतात, ‘माझं वय ६५ वर्षे आहे. मरण्यापूर्वी एकदा तरी खोलीत राहता आलं तरी बास..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा