पुणे : पुनर्विवाह करण्यासाठी इच्छूक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाई करण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्यांच्याकडून ७२ हजार रुपये उकळले. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कर्वेनगर भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक घटस्फोटित आहेत. ते पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. चोरट्यांनी त्यांना समाज माध्यमात एक फाॅर्म पाठविला. फाॅर्ममध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. शर्माने समाज माध्यमात अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. तिने बँक खात्यावर तातडीने पैसे भरण्यास सांगितले.
हेही वाचा…थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता?
आरोपी शर्माचा साथीदार विक्रम राठोडने त्यांच्याशी संपर्क साधला. दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याची बतावणी करुन त्यांना धमकावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली. त्याचा साथीदार राहुल शर्माने त्यांच्याशी संपर्क साधला. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांना बँक खात्यात ७२ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या ज्येष्ठाने त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता रोकडे तपास करत आहेत.
हेही वाचा…एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
सायबर चोरट्यांकडून ४२ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ४२ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत एका तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुणाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चोरट्यांनी ३२ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केली. भारती विद्यापीठ परिसरातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ लाख आठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
© The Indian Express (P) Ltd