पिंपरी : धर्मशाळेतील ८० वर्षीय वृद्धेला तिच्या खोलीला कुलूप लावून तीन दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी येथील हराळे धर्मशाळा येथे १ ते ४ जुलै २०२४ या कालावधीत घडला.

पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात मंगळवारी (२५ मार्च) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना आरोपींनी १ ते ४ जुलै या तीन दिवसाच्या कालावधीत धर्मशाळेतील त्यांच्या खोलीला व गेटला तसेच धर्मशाळेतील इतर खोल्यांच्या दरवाजाला कुलूप लावून डांबून ठेवले होते. फौजदार गिरीगोसावी तपास करीत आहेत.

तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू

तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का (शॉक) बसून ५५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात महावितरणच्या वायरमन व अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रामदास ठोंबरे (वय ३७, रा. रोहकल, ता. खेड) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहकल गावात नेमणुकीस असलेल्या वायरमन आणि इतर महावितरणचे अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे इलेक्ट्रिक खांबावरीलॲल्युमिनियमची तार तुटून लोंबत होती. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार देऊनदेखील वायरमन व इतर कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. ठोंबरे यांची चुलती (वय ५५) यांचा चुकून विजेच्या तारेला धक्का लागला. या धक्क्यात त्यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार मोरे तपास करीत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी महावितरणच्या तारा लोंबत असल्याचे दिसून येतात. डीपीचे झाकण तुटले आहेत.

आवाज दिल्याच्या रागातून तरुणांकडून एकाला मारहाण

आवाज दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलासह तीन ते चार जणांनी एका नागरिकाला मारहाण केली. ही घटना पिंपरीतील एचए मैदान पत्रा शेड येथे घडली.

दिगंबर बजरंग शेलार (वय ४५, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अल्पवयीन मुलासह १८ ते १९ वयोगटातील तीन तरुण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठलनगर येथील पत्राशेड परिसरात असताना फिर्यादी यांनी बंजारा असा आवाज दिल्याच्या रागातून आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, हातातील कड्याने मारून फिर्यादी यांच्या तोंडाला देखील दुखापत केली.