अमेरिकन सैन्यदलात काम करत असल्याचे सांगणाऱ्या महिलेने ‘शादी डॉट कॉम’वर ओळख काढून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची लग्नाच्या आमिषाने १८ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या महिलेने आपण अमेरिकी सैन्यदलातर्फे सध्या अफगाणिस्थानात नेमणुकीवर असल्याचे सांगितले होते. स्वत: जवळील २० लाख अमेरिकी डॉलर सोडवून घेण्यासाठी या ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी १८ लाख दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल मनोहर यल्लापूरकर (वय ६१, रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेगन डेटवायलर, मि. ख्रिस्तोफर जी. हिल, हुरेम राजसिंह, मुकेश तिवारी, डॉ. फ्रँक जेम्स, सुनील खरात यांच्या विरुद्ध फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यल्लापूरकर हे शिवाजीनगर येथील एका खासगी कंपनीत सरव्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांचा तीन वर्षांपूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी ‘शादी डॉट कॉम’ संकेतस्थळावर नोंदणी केली. ऑक्टोबर २०१२ मध्ये यल्लापूरकर यांना मेगन या महिलेचा संदेश आला. तिने अमेरिकी सैन्यदलात कॅप्टन असल्याची ओळख देऊन सध्या काबूल येथे नेमणुकीस असल्याचे सांगितले. त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्यांच्यात वेळोवेळी ई-मेलवरून संभाषण झाले. त्यांच्या ओळख वाढली. मेगन हिने यल्लापूरकर यांना काही बँकेची कागदपत्रे दाखविली. आपल्याकडे २० लाख अमेरिकी डॉलर असून ते सुरक्षित ठेवायचे आहेत, जवळचे नातेवाईक नसल्यामुळे त्याची जबाबदारी यल्लापूरकर यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. हे डॉलर सुरक्षिततेसाठी लंडन येथे पाठविल्याचे यल्लापूरकर यांना सांगितले.
मेगनने हे २० लाख डॉलर व महत्त्वाची कागदपत्रे ट्रंकमधून लंडनला पाठविले असल्याची माहिती देऊन यल्लापूरकर यांना ते सोडवून घेण्यास सांगितले. हे काम अवघड असल्याचे सांगून त्यांनी मेगनला त्यांचा कॅनरा बँकेचा खाते क्रमांक दिला. ही ट्रंक सोडविण्यासाठी यल्लापूरकर यांना वेळोवेळी १८ लाख ३३ हजार रुपये भरण्यास सांगितले. एवढे पैसे भरल्यानंतर त्यांना काहीच न मिळाल्यामुळे त्यांनी पुणे सायबर शाखेकडे तक्रार दिली. सायबर शाखेने तपास करून कोथरूड पोलिसांकडे हा तपास पाठविला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले तपास करत आहेत.