‘फिटनेस क्लब’ आणि तरुण हे रूढ समीकरण आता बदलत आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करणे ही केवळ तरुणांचीच मक्तेदारी नव्हे, असे म्हणत आता मध्यमवयीन लोकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकही तंदुरुस्तीसाठी फिटनेस क्लबचा रस्ता धरू लागले आहेत. फिटनेस क्लब्जमध्ये जाणाऱ्या एकूण सभासदांपैकी ३५ ते ४० टक्के लोक चाळिशी उलटलेले असून त्यातील सुमारे ५ ते १० टक्के लोक वयाची साठी पार केलेले असल्याची माहिती पुण्यातील काही फिटनेस क्लब व्यवस्थापकांनी दिली.
पूर्वी जिम म्हणजे वजन कमी करणे असा अनेकांचा समज होता. आता शारीरिक दुखण्यांवरील व्यायामांसाठी जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचे प्रमाण वाढते आहे. स्नायूंची आणि सांध्यांची दुखणी असलेले, हृदयविकाराचा त्रास असलेले लोकही आता आजारावर उपाय म्हणून फिटनेस क्लबमध्ये जाऊ लागल्याचे चित्र आहे. एका जिम व्यवस्थापकाने सांगितले, ‘‘चाळिशी आणि साठी उलटलेल्या सभासदांपैकी बहुतेक लोक उच्च रक्तदाब, रक्तातील साखर वाढणे, स्नायू आणि सांध्यांची दुखणी अशा आजारांवर जिममध्ये जाऊन स्वत:चा ‘स्पेशलाईज्ड वर्कआऊट’ करत आहेत. हृदयविकारासारख्या शस्त्रक्रिया झालेले लोकही पथ्यकारक व्यायामांसाठी जिमला पसंती देत आहेत.’’
व्यायामाबद्दल नागरिकांची जागरुकता वाढताना दिसत असल्याचे मत ‘तळवलकर्स’च्या विक्री व्यवस्थापक निलोफर यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘चाळिशी उलटलेल्यांपासून अगदी सत्तर वर्षांपर्यंतचे लोकही व्यायामासाठी जिममध्ये जात आहेत. आलेल्या प्रत्येक मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ नागरिकांचे व्यायामाचे उद्दिष्ट वेगळे असते. काहीजण केवळ वजन कमी करण्यासाठी येतात, तर काहींना शस्त्रक्रियेनंतर किंवा एखाद्या दुखण्यानंतर शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी व्यायाम करायचा असतो. काहीजण केवळ तंदुरुस्ती कायम राहावी यासाठीही येतात. प्रत्येकाचे उद्दिष्ट आणि शारीरिक प्रकृती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगळा वर्कआऊट सुचवला जातो.’’
ज्येष्ठ नागरिकही आता ‘फिटनेस क्लब’मध्ये !
जिममध्ये जाऊन व्यायाम करणे ही केवळ तरुणांचीच मक्तेदारी नव्हे, असे म्हणत आता मध्यमवयीन लोकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकही तंदुरुस्तीसाठी फिटनेस क्लबचा रस्ता धरू लागले आहेत.
First published on: 06-03-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior citizens trying fitness club