ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरामधील एसटीचे तिकीट घेण्यासाठी आता आरक्षण केंद्रावर किंवा आरक्षण एजंटकडे जाण्याची गरज नाही. एसटीच्या ई-तिकीट आरक्षणात आता ज्येष्ठांच्या सवलतीच्या तिकिटांचाही समावेश करण्यात आल्यामुळे इतरांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनाही घरबसल्या तिकीट उपलब्ध होणार आहे. शुक्रवारपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या साध्या व निमआराम (हिरकणी) गाडय़ांमध्ये तिकिटाच्या दरामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येते. मात्र या तिकिटांचे आरक्षण ई-तिकीट आरक्षणाद्वारे करता येत नव्हते. तिकिटाचे आरक्षण करण्यासाठी ज्येष्ठांना थेट एसटीचे आरक्षण केंद्र किंवा अधिकृत आरक्षण एजंटकडे जावे लागत होते. मात्र आता हे सवलतीचे तिकीट घरसबल्या मिळू शकणार आहे.
ई-तिकीट सुविधेचा लाभ घेऊन हे तिकीट आरक्षित करण्याच्या वेळी ज्येष्ठ नागरिकत्वाच्या अधिकृत दाखल्याची नोंद करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाचे कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तहसीलदार कार्यालयाचे कार्ड, राज्य परिवहन महामंडळाने दिलेले कार्ड, पॅन कार्ड आदींपैकी एका ज्येष्ठ नागरिकत्वाच्या दाखल्याची नोंद आवश्यक आहे. नोंदविण्यात आलेला मूळ दाखला ई-तिकिटांसोबत जवळ बाळगणे अनिवार्य आहे. या दाखल्यांपैकी पॅन कार्डवर राहण्याचा पत्ता नसल्याने सवलतीच्या आरक्षणासाठी पॅन कार्डची नोंद करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाच्या वेळी पॅन कार्डासोबत महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे फोटो प्रमाणपत्र सोबत बागळणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांनाही घरबसल्या मिळणार एसटीचे सवलतीचे तिकीट
एसटीच्या ई-तिकीट आरक्षणात आता ज्येष्ठांच्या सवलतीच्या तिकिटांचाही समावेश करण्यात आल्यामुळे इतरांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनाही घरबसल्या तिकीट उपलब्ध होणार आहे.
First published on: 21-12-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior citizens will get e ticket from home only