ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक, प्रसिद्ध वक्ते, महानुभाव पंथाचे अभ्यासक महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी जयश्री, मुलगा अंबरिश आणि स्नुषा असा परिवार आहे.
मूळचे औरंगाबाद येथील देशपांडे गेले काही दिवस आजारपणामुळे औरंगाबादहून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच इतिहास, पुरातत्त्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
मराठवाडय़ातील एक ज्येष्ठ संशोधक,अभ्यासक, कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या देशपांडे यांचे शिक्षण नागपूर आणि मध्यप्रदेशातील सागर येथे झाले. यानंतर त्यांनी पैठण, औरंगाबाद आणि नागपूर येथील महाविद्यालयात इतिहास अध्यापनाचे काम केले. यामध्ये औरंगाबाद येथील सरस्वती महाविद्यालयात सलग ३१ वर्षे इतिहास अध्यापनाचे काम केले. शिक्षणाबरोबरच इतिहास संशोधनात उतरलेल्या देशपांडे यांनी पुढे महाराष्ट्रातील सातवाहनापासून ते मराठय़ांच्या कालखंडापर्यंतचा मोठा अभ्यास केला. या कालखंडाबरोबरच अजिंठा-वेरूळची लेणी, पैठण, सातवाहन समाज, महानुभाव पंथ, संत वाड्.मय, कवी भूषण हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते.
या संशोधनावरच त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील ‘देवगिरीचे यादव’, ‘शोधमुद्रा’, ‘शब्दवेध’, ‘चक्रपाणी-चिंतन’, ‘रत्नशाळा पूर्वार्ध’, ‘सप्तपर्णी’, ‘इये नाथांचिये नगरी’, ‘दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ते ४’ अशा अनेक ग्रंथांनी इतिहासात मोठे योगदान दिले आहे. पुस्तकांशिवाय त्यांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय परिषदांमधून शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. शेकडो लेख, स्मरणिकांचे संपादन, प्रकल्पांमधील सहभाग त्यांच्या नावावर जमा आहेत.
मराठी, हिंदी, इंग्रजीशिवाय संस्कृत, गुजराथी, कन्नड, बंगाली, उर्दू अशा दहाहून अधिक भाषांवर देशपांडे यांचे प्रभुत्व होते. महाराष्ट्रातील बहुतांश बोलीभाषा त्यांना अवगत होत्या. ब्राह्मी, फारसी, मोडी लिपीचे ते तज्ज्ञ होते.
नागपूर, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी त्यांचा जवळचा संबंध होता. खान्देश इतिहास परिषद आणि कर्नाळा दुर्ग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ, मराठावाडा साहित्य परिषद, नटनागर शोधसंस्थान (मध्यप्रदेश), यक्षायतम प्रतिष्ठान, अखिल महानुभाव परिषद, हिंद-उर्दू सोसायटी, छत्तीसगड शोधसंस्थान आदी संस्थांशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. त्यांनी त्यांच्याकडील ग्रंथसंपदा आणि दुर्मिळ वस्तू भारत इतिहास संशोधक मंडळाला देणगी म्हणून बहाल केल्या होत्या.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांचे निधन
ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक, प्रसिद्ध वक्ते, महानुभाव पंथाचे अभ्यासक महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
आणखी वाचा
First published on: 07-08-2013 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior historian dr bramhanand deshpande passed away