पुणे : ‘समाजात दोन प्रकारचा ब्राह्मणवाद आहे. त्यातील एक उघड ब्राह्मणवाद देशावर राज्य करत आहे, तर दुसरा छुपा ब्राह्मणवाद वावरत आहे. महाराष्ट्रात ब्राह्मणवादाची पाळेमुळे बळकट असून, या ब्राह्मणवादाशी लढा देण्यासाठी कोणीही नाही, ही शोकांतिका आहे’, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी रविवारी व्यक्त केली.

आर्ष प्रकाशनतर्फे डॉ. सी. पी. थोरात यांच्या ‘कांशीराम : मनुवादापुढे आव्हान’ या पुस्तकाचे प्रकाशन राजू परूळेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे, प्रकाशक दिलीप चव्हाण या वेळी उपस्थित होते.

परुळेकर म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवादाची पाळेमुळे अत्यंत बळकट आहेत. या ब्राह्मणवादाशी लढा देणे सोपे नाही. लढा विजयामध्ये किंवा पराभवात परावर्तित होतो हे महत्त्वाचे नसून, लढा कोण देत आहे हे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, सध्या हा लढा देण्यासाठी कोणी नाही. ब्राह्मणवादी माणसाने जय भीम म्हणल्यावर चळवळीतल्या व्यक्तीच्या अंगावर रोमांच येतात. मात्र, असे म्हणणे हे त्याचे धोरण असू शकते. पुढच्या शंभर किंवा हजार वर्षांवर प्रभाव टाकेल अशी एक संस्कृती, विचारसरणी समाजात दृढ झाली पाहिजे. त्यातूनच समतेच्या विचारांना खरा अर्थ प्राप्त होईल.’

थोरात म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांनी समाजाला जागृत केले. आंबेडकरी चळवळीत पदाची अपेक्षा न ठेवता काम करणे, हाच खरा आंबेडकरवाद आहे, असे म्हणावे लागेल. मात्र, सध्या आंबेडकरी चळवळीत विरोधाभास निर्माण झाला असून, तरुण वर्ग अधिक संभ्रमात आहे. त्यामुळे आपला मित्र कोण आणि शत्रू कोण, हे ओळखायला तरुणांनी शिकले पाहिजे.’

‘आंबेडकरवादी होणे अत्यंत अवघड’

देशातील प्रत्येक पुरोगामी हा स्वत:ला आंबेडकरवादी मानत आहेत. मात्र, जोपर्यंत जातीची पाळेमुळे नष्ट करून एकधोरणानुसार आंबेडकरी चळवळीत विलीन झाले, तर आंबेडकरवादी म्हणता येईल. त्यामुळे पुरोगामी होणे सोपे आहे, आंबेडकरवादी होणे अत्यंत अवघड असल्याचे मत मधु कांबळे यांनी मांडले. आता केवळ ग्रंथ वाचून चालणार नाही, तर विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून लढा देणे महत्त्वाचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.