सध्या देशामध्ये अपेक्षांचे स्थापत्य निर्माण करण्यात आले असून त्या स्थापत्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा नाटकी मुखवटा आहे. पंतप्रधान दांभिक तर, राहुल गांधी अपरिपत्व आहेत. मग, सामान्यांनी अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडून असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी शनिवारी उपस्थित केला. देशात सर्व धर्माचे लोक आनंदाने राहू शकणार नसतील, सर्वाना समान न्याय मिळणार नसेल, िहसक घटना वाढत जाणार असतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अडचणीत येणार असेल आणि असहिष्णूता वाढतच जाणार असेल तर, आपल्याला देशद्रोह करावाच लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सोशालिस्ट पार्टी (इंडिया) आणि लोकायत यांच्यातर्फे कॉ. गोिवद पानसरे स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाजपेयी यांचे व्याख्यान झाले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, लाल निशाण पक्षाचे भालचंद्र केरकर, लोकायतच्या अलका जोशी आणि नीरज जैन या वेळी उपस्थित होते.
मोदी यांच्या नाटकीपणाला भुललेली भारतातील युवा शक्ती हीच आता त्यांचा विरोध करताना दिसत आहे. हाच एक आशेचा किरण असल्याचे सांगून वाजपेयी म्हणाले, एकेकाळी सक्रिय असलेला समाजातील मध्यमवर्ग सफलता, समृद्धता आणि सुरक्षितता यांच्या आंधळ्या शर्यतीमध्ये धावतो आहे. आत्मकेंद्री वृत्तीमुळे आमची स्वप्नेदेखील तुच्छ वाटावीत अशीच आहेत. दूरचित्रवाणीच्या मूर्ख पेटीसमोर बसून बहुतांश सुशिक्षित लोक मुग्ध आणि निष्क्रिय झाले आहेत. उद्योग-व्यापार आणि बाजार व्यवस्थेने मोदी यांना सत्तेवर आणले. आता हीच व्यवस्था त्याची किंमत वसूल करीत आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांना बाजूला सारण्याचे काम काही लोक करीत आहेत. अशा वेळी त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडसही हल्ली कोणामध्ये दिसत नाही. आम्ही काही लोकांनी पुरस्कार परत करून सरकारला प्रश्न विचारला. पण, प्रश्न विचारणाऱ्यांची त्यांनी टिंगलटवाळी केली. सामान्यांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत अनेकांनी भाष्य केले असले तरी पंतप्रधान या विषयावर भारतात काही बोलले नाहीत. रोहित वेमुलाप्रकरणी त्यांनी व्यक्त केलेली भावुकता हीसुद्धा नाटकीच आहे.
संघाचा हिंदूूंनाच सर्वाधिक धोका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वात जास्त धोका हिंदूू समाजाला आहे, अशी टीका अशोक वाजपेयी यांनी केली. संघाबरोबरच इतर संघटना आणि पक्षात असलेली कट्टरता हीसुद्धा तेवढीच धोक्याची आहे. आपल्यामध्येही काही शत्रू दडले आहेत. या विरोधात सत्याग्रह उभा राहात असून त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर युवक सहभागी होत आहेत.

Story img Loader