पुणे : मराठी भाषेविषयी आपण अभिमान बाळगतो, वेळप्रसंगी आक्रमक होतो. पण, मराठी भाषेसाठी काय करतो, असा प्रश्न उपस्थित करत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी मराठी शाळा बंद पडत असताना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करणे हा विरोधाभास असल्याचे अधोरेखित केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त संवाद पुणे, कोहिनूर ग्रुप, महक यांच्यातर्फे आयोजित माझा ‘मऱ्हाटाचि बोलू कवतिके’ या कार्यक्रमावेळी आळेकर बोलत होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका बकुल पंडित, लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, शाहीर हेमंतराजे मावळे, राजाभाऊ चोपदार, त्यागराज खाडिलकर, रघुनाथ खंडाळकर, मनीषा निश्चल यांना सन्मानित करण्यात आले.
आळेकर म्हणाले, ‘मराठी भाषा आजवर पारंपरिक कला, बोलीभाषांतून जिवंत राहिली. कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. आदिवासी भाषा, बोलीभाषा भाषेसाठी महत्त्वाच्या असतात. भाषा जीवनात कशी झिरपते याचे काही गणित नाही. इतक्या वर्षांत अनेक परदेशी शब्द स्वीकारले आहेत. त्यातूनच मराठी समृद्ध होत गेली. मात्र, आता भाषेविषयीच्या संवेदना क्षीण झाल्या आहेत. दिल्लीकडून हिंदी थोपवली जाते, पंजाबी खाणे अंगावर घेतले जाते, त्याशिवाय सर्वांचे लक्ष स्मार्टफोनमध्ये गुंतलेले आहे. मराठीचे काय होणार याची चिंता व्यक्त केली जात आहे. या वातावरणातून नवी संस्कृती येणार आहे का, हा प्रश्न आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुले इंग्रजी माध्यमात शिकतात, महाविद्यालयात गेल्यावर मराठी नाटकातच काम करतात, तेव्हा इंग्रजी नाटकात काम करत नाहीत. ‘स्टँडअप कॉमेडी’ही मराठीतून होतात. करोना प्रादुर्भावानंतर मराठी नाटक उत्तम पद्धतीने सुरू आहे. पण, मराठी भाषा शाळा, पाठ्यपुस्तकांतून, कथा-कादंबऱ्यांतून पुस्तकांतून टिकत नाही, हे दुर्दैव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र, अभिजात मराठी बंदिस्त होऊ नये. गोंधळ जागरण, वारीसारखी अव्याहत राहिली पाहिजे, अशी भावना डॉ. खांडगे यांनी व्यक्त केली.
कोट्यवधी रुपयांचा खर्च मराठी शाळांसाठी का नाही?
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहेत. मराठी भाषेच्या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. तसेच ते मराठी शाळांवर का खर्च होत नाहीत, असा प्रश्न कृष्णकुमार गोयल यांनी उपस्थित केला. मोठमोठे कार्यक्रम करणे हीच मराठी भाषेची सेवा आहे, असे नाही, तर मराठी शाळांमध्ये मुले शिकणे ही देखील मराठीची सेवाच आहे. तमीळ, बंगालीप्रमाणे मराठीसाठीही आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर मराठीसाठी केला पाहिजे. १० कोटी लोकांची मराठी भाषा लोप पावू नये यासाठी सर्वांनीच काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.