‘‘मनुष्यत्व आणि कवित्व यांचा ज्याच्यात संगम असतो तो खरा कवी! या संगमामुळेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक कवी म्हणतात. आधुनिक काळात मंगेश पाडगावकर यांची कविता तशी आहे. त्यांच्यातील माणसाने त्यांच्यातील कवीवर कधी मात केली नाही!’’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना मोरे यांच्या हस्ते ‘म.सा.प. सन्मान पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी मोरे बोलत होते. ज्येष्ठ लेखक डॉ. अशोक कामत यांना या वेळी ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्यकारी विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, उल्हास पवार या वेळी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘पाडगावकर सौंदर्यवादी आहेत. त्यांना निसर्गाची ओढ आहे. त्यांनी कवितेत सामाजिक समीक्षाही केली. ‘कवीमधील माणूस वारंवार त्याच्यातील कवीवर आक्रमण करीत असतो. त्यामुळे कवी होणे फार जोखमीचे काम असते’, असे कवी बा. भ. बोरकर म्हणत. पाडगावकर यांच्यातील माणसाने त्यांच्यातील कवीवर कधी मात केली नाही. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट ही त्रिमूर्ती मराठी कवितेतील ब्रह्मा, विष्णू आणि महेशच आहेत!
डॉ. अशोक कामत यांनी पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासन कसे उभे केले, हे मी पाहिले आहे. संतांच्या काव्याचाच अभ्यास होतो पण कार्याचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे संत सामान्यांच्या जीवनात कसे डोकावतील यावर कामत यांनी भर दिला.’’
पाडगावकर यांनी या वेळी आपल्या काही कवितांचे वाचन केले.
‘संतांच्या नावाची अध्यासने दुर्लक्षितच!’
डॉ. अशोक कामत म्हणाले, ‘‘विद्यापीठात संतांच्या नावाने अध्यासने उभी केली जातात, पण त्यातील एकाही अध्यासनाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले गेले नाही. मी पुणे विद्यापीठातील नामदेव अध्यासनाचा कारभार पंचवीस वर्षे लोकाश्रयाने सांभाळला. मी मूळचा हिंदी भाषेचा अभ्यासक असल्यामुळे माझ्याकडे संकुचित दृष्टीने पाहिले गेले. प्राध्यापकांचे काम केवळ व्याख्याने द्यायचे नसते. संतसाहित्यात प्रत्यक्ष काम करणे आवश्यक असते. रद्दीतून रत्ने गोळा करून मी संदर्भग्रंथ शाळा उभारली आहे. पुणे विद्यापीठाच्या चौकटीत राहून मला जे करता आले नाही ते मी आता ‘गुरुकुल’ या संस्थेमार्फत करीत आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा