ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभासंपन्न गायक आणि संगीतातील विविध रागांचा व बंदिशींचा मोठा संग्रह मुखोद्गत असणारे गायन गुरु पं. केदार बोडस (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. ते अविवाहित होते. जुन्या पिढीतील ज्येष्ठ गायक पं. लक्ष्मणराव बोडस हे त्यांचे आजोबा आणि संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक-नट पं. नारायणराव बोडस यांचे केदार हे पुत्र आणि शिष्य होत.
मधुमेहाच्या त्रासामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बोडस पुण्यातच होते. मधुमेह आणि त्यातून निर्माण झालेल्या काही विकारांमुळे सोमवारी दुपारी खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे ८७ वर्षांच्या मातोश्री आहेत. प. केदार बोडस यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा >>>पुणे: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
लहानपणी केदार तबलावादन करीत असत. नंतर त्यांनी गायनामध्ये रुची घेतली. आजोबा आणि वडिलांकडून त्यांना घरामध्येच गायनाचे शिक्षण मिळाले. नंतरच्या काळात डाॅ. अशोक दा. रानडे आणि भेंडीबाजार घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. त्र्यंककराव जानोरीकर यांचेही मार्गदर्शन लाभले. वडिलांच्या संगीतातील मार्गदर्शनाबरोबरच केदार यांचा गायनामध्ये एक स्वतंत्र विचार होता. संगीतातील विविध रागांचा आणि बंदिशींचा त्यांच्याकडे खूप मोठा संग्रह होता.
कर्नाटकातील हुबळीजवळ गंगुबाई हनगल गुरुकुल येथे पं. केदार बोडस संगीत शिकवीत असत. गोड गाण्याबरोबर आणि गोड स्वभावामुळेच शिष्यांमध्ये ते प्रिय होते. प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहून त्यानी संगीताची आराधना केली. त्यांच्या प्रत्येक मैफीलीतून नेहमीच नवीन काहीतरी हमखास ऐकावयास मिळायचे. त्यामुळेच त्यांच्या कार्यक्रमाला श्रोत्यांबरोबर कलाकारही हजेरी लावत असत. म्हणूनच जगभर त्यांचे चाहते आहेत. पं. मल्लिकार्जुन मन्सूर पुरस्कार प्रदान करून २०१८ मध्ये त्यांच्या संगीत सेवेचा गौरव करण्यात आला होता.
हेही वाचा >>>पुणे: ससून रुग्णालयातून आरोपी पसार
रशियन भाषेचा चार वर्षांचा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केल्याने पं. केदार बोडस यांनी पाश्चिमात्य अभिजात संगीत आणि रशियन लोकसंगीताच्या तौलनिक अभ्यासाचा खजिना खुला झाला होता. त्यांनी सहा लघुपटांसाठी संगीत दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती.