पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणारे नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली. बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले.

हेही वाचा: पुणे: गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात बदल करण्याची विद्यापीठाची भूमिका

१९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

हेही वाचा: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्लेंची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू

डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा

  • ‘मूड्स’ (कवितासंग्रह)
  • ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ (कथासंग्रह)
  • ‘राजधानी’ (दीर्घकथा संग्रह)
  • ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ (कादंबरी)
  • ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता : एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ (समीक्षात्मक)
  • ‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी)
  • ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य),
  • ‘जोतीपर्व’ (अनुवादित पुस्तक)
  • ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ (संपादन)
  • पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior writer dr nagnath kottapalle passed away in pune print news tmb 01