पाठय़पुस्तकांमध्ये होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आणि अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये स्वतंत्र शैक्षणिक कक्ष तयार करून शैक्षणिक सहसंचालकाचे पद निर्माण करण्याचा विचार मंडळाकडून केला जात आहे.
या वर्षीच्या दहावीच्या भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र या विषयाच्या पुस्तकांमध्ये चुका झाल्या आहेत. अशा चुका होऊ नयेत यासाठी आणि अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक कक्ष तयार करण्याचा मंडळाकडून विचार केला जात आहे. या शैक्षणिक कक्षामध्ये विविध विषयाचे तज्ज्ञ, संशोधक, मूल्यमापन संशोधक यांचा समावेश असणार आहे. या कक्षाचा प्रमुख म्हणून सहसंचालक दर्जाच्या पदाची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली.
याबाबत जाधव यांनी सांगितले, ‘‘एकदा अभ्यास मंडळाची निर्मिती झाली, की त्या विषयाच्या पुस्तकांचा आराखडा तयार करणे, पुस्तकांची निर्मिती या सगळ्याला अभ्यास मंडळ जबाबदार असते. अभ्यास मंडळाला पाठय़पुस्तक तयार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असते. अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शैक्षणिक कक्षाची निर्मिती करण्याचा आणि सहसंचालक दर्जाचे पद निर्माण करण्याचा विचार मंडळ करत आहे. २००७ मध्ये पुस्तक निर्मितीबाबत नेमण्यात आलेल्या आमदारांच्या समितीनेही अशा प्रकारची सूचना केली होती.’’ दहावीच्या इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये झालेल्या चुकांबद्दल जाधव यांनी मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा