विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ‘परीक्षा संगम’ या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांना या संकेतस्थळाद्वारे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, विशेष सुविधांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना त्याबाबत नोंदणी करण्यासाठी ३० डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पिंपरीः पवना नदीत थेट सांडपाणी; खासदार बारणे यांची तक्रार
सीबीएसईने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विशेष गरजा असणारे विद्यार्थी दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी सुविधा आणि सवलती देण्याची विनंती करतात. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना हव्या असलेल्या सुविधा सवलतींची मागणी संकेतस्थळाद्वारे केल्यास त्यांना त्या सुविधा, सवलती परीक्षेवेळी पुरवल्या जाऊ शकतात. शाळांनी त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉगिन केल्यास त्यांना त्यांच्या शाळेतील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांची माहिती विभागानुसार दिसणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर त्याबाबत उल्लेख असेल आणि संबंधित केंद्र व्यवस्थापकाने त्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्याबाबतचे निर्देशही सीबीएसईने दिले. तसेच विशेष सुविधांबाबत ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.