शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप केला आहे. गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता शिवसैनिकाला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकण्याची धमकी देतो, असा आरोप आढळराव पाटलांनी केला. तसेच आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडी सरकार आहे, तर तुमचं चालू द्या, फक्त आम्हाला जिल्ह्यात जगू द्या, असंही नमूद केलं. ते झी २४ तास वृत्तवाहिनीशी बोलत होते.
शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, “याच जिल्ह्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याने ४ दिवसापूर्वी माझ्या एका कार्यकर्त्याला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवलं म्हणून धमकावलं. त्याला मारण्याची धमकी दिली. तुला गावात राहायचं का, तुला संपवून टाकू अशी धमकी गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता करतो आहे. आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडीचं सरकार आहे तर तुमचं चालू द्या, फक्त जिल्ह्यात आम्हाला जगू द्या, आम्हाला मारू नका. आघाडीने याबाबत मित्रपक्षांना सांगावं.”
“आता आम्ही विकास करू द्या, निधी द्या या मागण्याही सोडून दिल्या”
“आता आम्ही विकास करू द्या, निधी द्या या मागण्याही करायचं सोडून दिलं आहे. ही बैलगाडी शर्यत बंद करण्याचं कारण काहीच नव्हतं. फक्त शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव यांनी त्यांच्या गावात शर्यत भरवली हे त्यांच्या डोळ्यात खुपलं म्हणून त्यांनी स्थगिती दिली. कुणाच्या डोळ्यात खुपतं हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण जिल्हा आणि राज्याला हे माहिती आहे,” असं आढळरावांनी सांगितलं.
“माझा शिवसेनेचा खेड तालुक्याचा पंचायत समिती सभापती ६ महिन्यांपासून तुरुंगात सडतो आहे. त्याच्यावर नाहक ३०७ चा गुन्हा दाखल केला. त्यावर डॉक्टरांचं प्रमाणपत्र देखील नाही. त्याला जामीन मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे आमदार आणि इतर नेते दबाव टाकत आहेत. ही गोष्ट मी माझ्या नेत्यांना वेळोवेळी कानावर घातली. त्यांनीही पाहिजे तशी मदत केली. परंतु हे चित्र एका बाजूला आहे. शिवसेनेच्या माझ्या सभापतीने काय घोडं मारलं होतं. त्याच्यावर खोटा गुन्हा का दाखल केला. त्याचं संपूर्ण घर तुरुंगात टाकलं,” असंही आढळरावांनी नमूद केलं.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत १०,००० लोक कसे चालले?”
शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, “जिल्हाधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी हे लिहून द्या, ते लिहून द्या म्हणत गावातील यात्रा कमिटीकडून अनेक कागदपत्रे घेतली. तसेच रात्री माझ्या घरी येऊन बैलगाडी शर्यतीला ५० पेक्षा अधिक माणसं येऊ देणार नाही असं सांगितलं. यावर मी म्हटलं दिवसभरात जिल्हा बँकेची राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा झाली. त्या सभेत १०,००० लोक होते. ते कसे चालले?”
हेही वाचा : आदित्य ठाकरेंना नेमकी धमकी दिली कुणी? गृहमंत्र्यांनी विधानसभेत केलं निवेदन; म्हणाले, “आरोपीचं नाव…”
“आघाडीतील घटक पक्षाने आम्हाला पुण्यात संपवण्याचा डाव करू नये”
“आघाडीतील घटक पक्षाने आम्हाला पुण्यात संपवण्याचा डाव करू नये, आम्ही तुमच्याकडे, सरकारकडे काही मागत नाही. आमची कुठलीच मागणी नाही, आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या. आम्हाला संपवू नका, आम्हाला मारू नका,” असं शिवाजी आढळराव म्हटले.