पुणे : औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेले कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन, हरितगृह वायू, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा वायू आणि पर्यावरणाचा नाश करणाऱ्या जीवनशैलीमुळे जागतिक तापमान वाढ वेगाने होत आहे. परिणामी मानव जातीसह पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी केले.
इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थी, प्राध्यापक, हवामान विभागातील शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – गुंतागुंतीच्या तीन शस्त्रक्रियांनंतर तो पुन्हा पायावर उभा!
पर्यावरण बदल आणि आपली भूमिका या विषयावर बोलताना डॉ. महापात्रा म्हणाले, औद्योगिक क्रांतीनंतर कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वेगाने वाढत आहे. चीन, अमेरिकेच्या खालोखाल भारताचा कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात तिसरा क्रमांक लागतो. यासह हरितगृहातून उत्सर्जित होणारा वायू, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा वायू आणि जगभरात पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या जीवनशैलीचा पुरस्कार केला जात असल्यामुळे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीच अडचणीत आली आहे. ध्रुवांवरील हिमनग वेगाने वितळत असल्यामुळे समुद्राची पाणी पातळी दर वर्षी एक मिलीमीटरने वाढत आहे. किनारी भागात पाण्याचे तापमान वाढत आहे. पाणी दूषित आणि आम्लयुक्त होत असल्यामुळे किनारी भागातील मासेमारी अडचणीत आली आहे.
हेही वाचा – पिंपरी महापालिकेच्या नोकर भरतीच्या निकालाला अखेर मुहूर्त
वाढत्या तापमानामुळे जगभरात तापमान वाढ, उष्णतेच्या लाटा, तीव्र हिवाळा आणि तीव्र उन्हाळ्याला लोकांना सामोरे जावे लागत आहे. जगभरात चक्रीवादळांची संख्याही वाढली आहे. सुदैवाने अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांच्या संख्येत फारसा फरक पडला नाही. परिणाम भारतीय उपखंडातील पाऊसमान सरासरी राहिले आहे. पण, पावसाचे असमान वितरण होत असल्यामुळे दुष्काळी पट्टे वाढले आहेत. कमी दिवसांत जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व पर्यावरणातील बदलाचे परिणाम आहेत. पर्यावरण बदलामुळे श्रीमंत लोकांना फारशी झळ बसत नाही. मात्र, सामान्य लोकांची अन्नसुरक्षा अडचणीत आली आहे. तापमान वाढीमुळे जीवसृष्टीतील अनेक प्रजातींचा वेगाने नाश होत आहे. वेळीच सावध न झाल्यास, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार न केल्यास जीवसृष्टीसमोरील संकटे अधिक गंभीर होतील, असा इशाराही डॉ. महापात्रा यांनी दिला.