समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी केवळ चळवळी करून भागत नाही. समाजाच्या निरामय आरोग्यासाठी जागृत असलेला सेवाभाव ही देखील एक प्रकारची राष्ट्रभक्तीच आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनतर्फे श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘शतायुषी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. मुंबई येथील केईएम हॉस्पिटल आणि रहेजा हॉस्पिटलचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. अनिल भारोस्कर यांचे ‘मधुमेह : जुना आजार नवे उपचार’ या विषयावर व्याख्यान झाले. फाउंडेशनचे संचालक डॉ. अरिवद संगमनेरकर आणि दिवाळी अंकाच्या अतिथी संपादक डॉ. शैलजा काळे या वेळी व्यासपीठावर होत्या.
वैद्यक क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करणाऱ्या माणसांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगून श्रीनिवास पाटील म्हणाले, की व्यथित माणसाविषयी क़ळवळा असणे आवश्यक आहे. दु:खावर फुंकर घालून सामान्य माणसाला आधार देण्याची भूमिका महत्त्वाची आहे.
श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सातारा जिल्ह्य़ातील लोणंद येथील डॉ. संजय शिवदे यांना ‘शतायुषी सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा’ पुरस्कार, लोणीकाळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांना ‘शतायुषी सर्वोत्कृष्ट ग्रामीण आरोग्य सेवा’ पुरस्कार आणि वध्र्याच्या सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या डॉ. कीर्ती कुंदना हिला ‘शतायुषी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. संगमनेरकर यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या कार्याची आणि दिवाळी अंकाविषयी माहिती दिली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader