पुणे : तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पारपत्र कार्यालयातील (पासपोर्ट ऑफिस) सेवा काही तासांसाठी खंडित झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय झाली. सर्व्हरच्या कामात अडथळे आल्यामुळे ही गैरसोय झाल्याचे पारपत्र कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. पुण्यासह परभणी, अमरावती आणि गोवा, गुजरात येथेही सर्व्हरमधील बिघाडामुळे पारपत्र कार्यालयाचे काम काही तास ठप्प झाल्याचे दिसून आले.
पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांतील कामकाज सर्व्हरमधील बिघाडामुळे काही वेळासाठी ठप्प झाले. दुपारी दोनच्या सुमारास तांत्रिक दुरुस्ती करून सेवा पूर्ववत करण्यात आली असून ज्यांचे पारपत्र विषयक काम सोमवारी पूर्ण होऊ शकले नाही त्यांना नवीन वेळ निश्चित करून देण्यात येत असल्याचे ‘पासपोर्ट सेवा सपोर्ट’ तर्फे कळवण्यात आले आहे. सोमवारी (२५ जुलै) पुणे, परभणी, अमरावतीसह गोवा आणि गुजरात राज्यातील पारपत्र कार्यालयांमध्ये सर्व्हरमधील बिघाडामुळे कामकाज खंडित झाले. अनेक शासकीय सेवा ऑनलाईन झाल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणे आणि काम सुकर होणे अपेक्षित आहे, मात्र या सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक क्षमता नसल्यामुळे गैरसोय होत असल्याची भावना नागरिकांनी या वेळी व्यक्त केली.
सध्या कार्यालयीन काम, शिक्षणासाठी परदेशी जाणे तसेच पर्यटन अशा अनेक कारणांसाठी सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात पारपत्रासाठी अर्ज करतात. त्यासाठी पुरेशी तांत्रिक क्षमता नसल्यामुळे पारपत्र मिळवताना नागरिकांचा वेळ वाया जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली जाते. यामध्ये आधार, पारपत्र, रहिवासी दाखला, शेतीचे दाखले अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या प्रक्रिया सुलक्ष करण्यासाठी तांत्रिक क्षमता वाढवण्याची गरजही नागरिकांनी या वेळी बोलून दाखवली.
अमरावतीतही गैरसोय
सर्व्हरमधील बिघाडामुळे अमरावतीतील पारपत्र कार्यालयाचे कामकाज सकाळी १० ते दुपारी सव्वादोन पर्यंत ठप्प झाले. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला. पारपत्र कार्यालये नागरिकांना पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) देतात. सोमवारची वेळ मिळालेले नागरिक त्यांची इतर कामे बाजूला ठेवून पारपत्र कार्यालयात आले होते. मात्र, कामकाज ठप्प झाल्याने त्यांची गैरसोय झाली. दुपारनंतरही कामकाज संपूर्ण पूर्ववत न झाल्याने नागरिकांची अधिकच गैरसोय झाली. पारपत्र कार्यालयाकडूनही नेमकी अडचण काय आहे, ती दूर होण्यास किती वेळ जाईल याबाबत माहिती न मिळाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.