मुंबई-बेंगलोर महामार्गावरील चांदणी चौकात सतत होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पौंड रस्त्याला लागून महामार्गला सव्र्हिस रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चे मुख्य महाप्रबंधक धनराज तावडे यांनी मंगळवारी दिली.
गेल्या आठवडय़ात महामार्गावरील चांदणी चौकातील उतारावर एका दुचाकीवरील विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. या ठिकाणी पूर्वीही अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कोथरूड भागातील राजकीय पक्षांच्या वतीने हा रस्ता रुंदीकरणाची मागणी केली जात होती. यामुळे कोथरूडचे आमदार चंद्रकांत मोकाटे, महापालिकेच्या अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर, प्रमोद निरभवणे उपायुक्त विजय दहिभाते, सहायक आयुक्त अविनाश सकपाळ, एनएचएआय चे अधिकारी राजेशकुमार कौंडल आदींनी मंगळवारी दुपारी चांदणी चौक परिसराची पहाणी केली. या शिष्टमंडळाने भूगावकडून येणाऱ्या टोलनाक्यापासून बावधनकडील उताराचा रस्ता, कोथरूड कडील उतार, वेदभवनकडून येणारा सव्र्हिस रस्ता, एनडीए रस्ता या ठिकाणांची पाहाणी केली.
तावडे यांनी सांगितले, की कोथरूड-पौंड रस्त्याला लागून महामार्गला हा सव्र्हिस रस्ता काढण्यात येणार आहे. त्याच बरोबर चांदणी चौकातील उताराचा रस्ता, भुगावच्या दिशेकडून टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याविषयी या वेळी चर्चा झाली. त्यामुळे महामार्गावरील वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. उतारावरील रस्ता रुंदीकरणासाठी टेकडी फोडून रस्ता रुंद करण्याचे काम पूर्ण होण्यास किमान चार महिने तर सव्र्हिस रस्ता होण्यास दोन महिने लागतील.
या वेळी चंद्रकांत मोकाटे यांनी महामार्गाच्या संथगतीच्या कामावर अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. राष्ट्रीय महामार्गाच्या १४० किलोमीटर पैकी ८० किमी रस्त्याचे काम खासगी कंपनी करत आहे. मार्च महिना झाला, तरी आणखी पन्नास टक्केही काम झालेले नाही. काम करण्यास आणखी वेळ लागत असल्याचे अधिकारी सांगत असल्यामुळे मोकाटे यांनी अधिकाऱ्यांचा चांगलेच फैलावर घेतले. काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या