समाजातील दुर्बल घटकांना आजही शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि स्वावलंबनाच्या समस्या भेडसावत आहेत. या कामामध्ये सेवा आणि सहयोग द्यावा, अशी साद घालण्यासाठी तब्बल अडीच हजार चिमुकल्यांनी रविवारी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला. पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आयटियन्सतर्फे ‘सेवा सहयोग’ ही संस्था चालवली जाते. या संस्थेच्या समुत्कर्ष प्रकल्पांतर्गत ‘वॉक फॉर सेवा’ हा उपक्रम राबवण्यात आला.
पुणे शहरात साडेपाचशेहून अधिक झोपडपट्टय़ा आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येपकी ४५ टक्के लोकसंख्या या वस्त्यांमध्ये राहते. या वस्त्यांमधील रहिवाशांचे प्रश्न अन्य नागरिकांपर्यंत पोहोचवून सेवा सहयोग संस्थेतर्फे वस्ती विकासाचे काम करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणाईबरोबरच विविध क्षेत्रातील अभियंते, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. वॉक फॉर सेवाच्या निमित्ताने समाजाला या कामाची माहिती व्हावी तसेच समाजातील विविध घटकांनी या कामात सहभागी व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही फेरी लक्ष्मी रस्त्यावरुन टिळक रस्ता माग्रे काढण्यात आली होती.
संस्थेच्यावतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टय़ांमधील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यासंबंधीचा अहवाल विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांना देण्यात आला आहे. या अहवालावर चर्चा करण्यासाठी कार्यक्रमा दरम्यान परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला बी. आय. मेलन कंपनीचे दिनेश देव, क्रेडीट स्वीसचे सिड बॅनर्जी, इन्फोसिसचे प्रवीण कुलकर्णी, थिसनक्रुपचे अमोल पाटील, टाटा मोटर्सचे गिरीश वाघ, तसेच गिरीश प्रभुणे, किरण शाळीग्राम आदी उपस्थित होते. ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरही परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
टिळक रस्त्यावरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मदानावर झालेल्या या कार्यक्रमात खासदार अनिल शिरोळे, शेल्टर असोसिएशनच्या प्रतिमा जोशी, सिमेंटीकचे स्वप्नील भोसकर, संजय कुमार दळवी, अॅड. एस. के. जैन, सुनील मुतालिक, राजन गोरे, महेश करपे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. शहरी भागातील झोपडपट्टय़ांची सुधारणा, विकास हा समुत्कर्ष प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे सध्या ५० झोपडपट्टय़ांमध्ये शाळकरी मुलांसाठी अभ्यासिका चालवल्या जात आहेत. त्यात अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वस्तीतीलच स्वयंसेवक तरुण, तरुणी व विविध क्षेत्रातील स्वयंसेवक यामध्ये सेवा प्रदान करतात. बालविकास, किशोर किशोरी विकास, कौशल्य प्रशिक्षणद्वारे महिला विकास अशा पातळ्यांवर संस्थेचे काम चालत असल्याचे उपक्रमाचे प्रमुख शैलेश घाटपांडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा