सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या नावे समाजमाध्यमाद्वारे बनावट संदेश पाठवून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सात जणांना अटक केली. आराेपींना मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजीव कुमार शिवजी प्रसाद (रा. सिवान, बिहार), चंद्रभूषण आनंद सिंग (रा.गोपालगंज, बिहार), कन्हैय्याकुमार संभू महंतो (रा. सिवान, बिहार), रवींद्रकुमार हुबनाथ पटेल (रा. वाराणसी, उत्तरप्रदेश), रावी कौशलप्रसाद गुप्ता (रा. चिंगवाह, मध्यप्रदेश), यासीर नाझीम खान (रा. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), प्रसाद सत्यनारायण लोवुडू (रा. विशाखापट्टन्नम, आंध्रप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या खात्यात जमा झालेली १३ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहायक आयुक्त आर. एन. राजे या वेळी उपस्थित होते. सप्टेंबर महिन्यात ही घडली होती.  याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे वित्त विभागातील व्यवस्थापक सागर कित्तुर यांनी फिर्याद दिली होती.

हेही वाचा >>> पुणे: तोतया पोलीस गजाआड फसवणुकीचे चार गुन्हे उघड

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सतीश देशपांडे संचालक आहेत. ७ सप्टेंबर रोजी देशपांडे यांच्या मोबाइल क्रमांकावर अदर पूनावाला यांच्या नावे संदेश पाठविण्यात आला होता. त्वरीत एक कोटी रुपये जमा करावेत, असे संदेशात म्हटले होते. आरोपींनी पूनावाला यांचा मोबाइल क्रमांक हॅक करुन बनावट संदेश पाठविला होता. देशपांडे सीरम इन्सिट्यूटच्या खात्यातून एक कोटी एक लाख एक हजार ५४४ रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी पूनावाला यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार चार आरोपींना गेल्या महिन्यात बिहारमधून ताब्यात घेण्यात आले.  तपासात अन्य आरोपींची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर

आरोपी प्रसाद हा संगणक अभियंता आहे. रावी गुप्ता हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून तो एका बँकेत काम करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, राजाराम घोगरे, अमोल सरडे, किरण तळेकर, सागर घोरपडे, मनोज भोकरे, ज्ञाना बडे आदींनी ही कारवाई केली.

सीरम इन्स्टिट्यूटच्या फसवणूक प्रकरणात सात आरोपी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यात आणखी काही जण सामील आहेत का  यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. आरोपींच्या खात्यातील रक्कम गोठविण्यात आली आहे. – स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven arrested in serum institute s ceo aadar poonawala fraud case pune print news zws