पिंपरी : उद्यान, नगररचना आणि आरोग्य विभागाच्या सात लाचखोर निलंबित कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुन्हा सेवेत घेतले आहे. निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार सेवेत घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.
उद्यान विभागाचे पर्यवेक्षक संतोष लांडगे, संजीव राक्षे, उद्यान सहायक मच्छिंद्र कडाळे, भरत पारखी, नगर रचना विभागाचे सर्व्हेअर संदीप लबडे, सफाई कामगार दिलीप गायकवाड, सचिन डोळस यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यामुळे निलंबित केले होते. प्रशासनाने काही महिन्यांनी पुन्हा त्यांना सेवेत घेतले आहे.
हेही वाचा – मुदतीत सुनावणी कशी संपवणार? राहुल नार्वेकर यांचा शिंदे-ठाकरे गटाला सवाल
यामधील चार कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून विभागीय चौकशी सुरू आहे. तर, तीन कर्मचाऱ्यांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. चौकशी, न्यायालयीन सुनावणीच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून त्यांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस निलंबन आढावा समितीने केली. त्यानुसार निलंबन रद्द करून अकार्यकारी पदावर व जनसंपर्क येणार नाही अशा ठिकाणी त्यांना नेमणूक देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. लांडगे, राक्षे, कडाळे, पारखी यांना पुन्हा उद्यान विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तर, सर्व्हेअर लबडे यांना निवडणूक विभाग, सफाई कामगार गायकवाड व डोळस यांना आरोग्य मुख्यालयात नेमण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहे.