पुणे : शहरातील चौदा नाट्यागृहांचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सात कोटींची आवश्यकता भासणार असून महापालिकेकडून त्याबाबतचे पूर्वगणन पत्रक तयार करण्यात आले आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर नाट्यगृहांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील नाट्यगृहांची दुरवस्था झाली आहे. पायाभूत सुविधांचा अभाव बहुतांश नाट्यगृहात असून नाट्यकर्मींकडून त्याबाबत वेळोवेळी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शहरात महापालिकेची चौदा नाट्यगृहे आहेत. बालगंधर्व रंगमंदिर, स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सातारा रस्ता परिसरातील अण्णाभाऊ साठे रंगमंदिर ही प्रमुख नाट्यगृहे आहेत. मात्र, या चारही प्रमुख नाट्यगृहांची दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याचा अभाव, अस्वच्छ स्वच्छतागृहे, बंद अवस्थेतील वातानुकूलन आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा आहे. अनेक नाट्यगृहांना रंगरंगोटीची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेची दखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही घेतली होती. १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे पूर्ण करावी, असे आदेश पाटील यांनी दिले होते. नूतनीकरण करताना नागरिक आणि नाट्यकर्मींकडून सूचना मागविण्याचे आदेशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवडचे नाव बदलून जिजाऊनगर ठेवा!; फ्लेक्सद्वारे भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मागणी

नाट्यगृहांची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या भवन विभागाकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून सात कोटींच्या खर्चाचा आराखडा करण्यात आला असून त्याबाबतचे पूर्वगणनपत्रकही तयार करण्यात आले आहे. पूर्वगणन समितीची आराखड्याला मान्यता दिल्यानंतर त्याबाबतची निविदा काढण्यात येणार असून ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण होतील, असा दावा महापालिका प्रशानसाकडून करण्यात आला आहे.