पुणे: सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाला अतिक्रमणांचा अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अतिक्रमणे हटविण्याची सूचना संबंधितांना केली आहे. सात दिवसांच्या मुदतीत अतिक्रमणे न हटविल्यास प्राधिकरणाकडून ती काढून टाकण्यात येतील आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये आठ किलोमीटर लांबीच्या अंतरात विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण नियोजित असून या अतिक्रमणांचा विस्तारीकरणाला अडथळा ठरत आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत, अशी सूचना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
संबंधित मिळकतधारकांनी स्वखर्चाने अतिक्रमणे काढून टाकावीत. अन्यथा प्राधिकरणाकडून ती काढून टाकण्यात येतील आणि त्याचा खर्च संबंधितांकडून दंडाच्या रकमेसह वसूल केला जाईल, असे प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी स्पष्ट केले आहे.