पुणे : देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये घरांची विक्री होण्याचा सरासरी कालावधी २० महिन्यांवर आला आहे. या सात महानगरांमध्ये चालू वर्षातील जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत घरांची विक्री वाढल्याने हा कालावधी कमी झाला आहे. मागील पाच वर्षांतील हा नीचांकी कालावधी ठरला आहे.
बांधकाम क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘अनारॉक’ने दिल्ली, मुंबई महानगर, बंगळुरू, पुणे, चेन्नई, कोलकता आणि हैदराबाद या सात महानगरांतील मालमत्ता विक्रीसंबंधी अहवाल सोमवारी जाहीर केला. पहिल्या तिमाहीत सात महानगरांमध्ये घरांची विक्री होण्याचा कालावधी २० महिन्यांवर घसरला आहे. तो २०१८ मधील पहिल्या तिमाहीत ४२ महिने आणि २०२० च्या पहिल्या तिमाहीमध्ये ५५ महिने या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. घरांच्या विक्री न होण्याचा कालावधी अधिक असल्यास घरांची विक्री कमी असल्याचे मानले जाते. घरांच्या विक्रीचा कालावधी कमी असल्यास घरांना मागणी असल्याचे निदर्शक असते.
हेही वाचा – ‘हम करे सो कायदा’ चालणार नाही; पालकमंत्र्यांचा वेताळ टेकडी रस्ता विरोधकांना टोला
देशातील महानगरांमध्ये बंगळुरूत घरांची विक्री होण्याचा कालावधी सर्वांत कमी १३ महिने आहे. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत हा कालावधी राजधानी दिल्लीत २३ महिने आणि मुंबई महानगरामध्ये २१ महिन्यांवर आला आहे. मुंबईत पहिल्या तिमाहीत ३४ हजार ६९० घरांची विक्री झाली. हैदराबादमध्ये हा कालावधी २१ महिने, चेन्नई २० महिने आणि कोलकता २० महिने आहे.
विक्री न झालेल्या घरांच्या संख्येत घट
पहिल्या तिमाहीत सातही महानगरांमध्ये १ लाख १४ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली. तिमाहीत घरांची विक्रमी विक्री नोंदवण्यात आली. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे ग्राहकांनी घर खरेदीला प्राधान्य दिले. आलिशान घरांची वाढलेली मागणीही पहिल्या तिमाहीत विक्रीत वाढ नोंदवण्यास कारणीभूत ठरली. सातही महानगरांत विक्री न झालेल्या घरांच्या संख्येत मागील ५ वर्षांत १२ टक्के घट झाली आहे. विक्री न झालेल्या घरांची संख्या २०१८ च्या पहिल्या तिमाहीत ७ लाख १३ हजार ४०० होती. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीअखेर ती ६ लाख २६ हजार ७५० वर आली.
पुण्यात २० महिन्यांचा कालावधी
पुण्यात घरांची विक्री होण्याचा कालावधी पहिल्या तिमाहीच्या अखेरीस २० महिन्यांवर आला आहे. हा कालावधी २०१८ मधील पहिल्या तिमाहीच्या अखेरीस ४० महिने होता. तो नंतर २०२१ च्या पहिल्या तिमाहीत वाढून ४३ महिन्यांवर पोहोचला होता.