पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी तपास करून अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक केली. अपहृत बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

मोहम्मद खान कुरेशी (वय २७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बालकाची आई पूजा संतोष दास (वय २८, रा. झारखंड) यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पुणे रेल्वे स्थानकातून १७ सप्टेंबर रोजी पूजा दास नातेवाईकांसोबत झारखंडला निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर सात महिन्यांचा मुलगा होता. रेल्वे स्थानकाच्या आवारात आरोपी मोहम्मद आणि नजमा यांनी पूजाशी ओळख केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. पूजा यांच्या ताब्यातून बालकाला नजमाने घेतले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून मोहम्मद आणि नजमा पसार झाले.

हे ही वाचा…Pune Helicopter Crash : सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालं होतं पुण्यात कोसळलेलं ‘ते’ हेलिकॉप्टर; टेक ऑफनंतर काही वेळातच…

गणेश विसर्जनाच्या रेल्वे स्थानकाच्या आवारातून बालकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरु केले. बालकाचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपासात पसार झालेले आरोपी अहमदाबादमधील उनावा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथक अहमदाबादला रवाना झाले. पोलिसांनी नजमा आणि मोहम्मद यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.

हे ही वाचा…विद्यार्थ्यांना मापाचे नसलेले, फाटलेले, उसवलेले गणवेश… राज्यात ‘गणवेश गोंधळ’का सुरू आहे?

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, इरफान शेख, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, सचिन नाझरे, पोलिस कर्मचारी सुनील कदम, अनिल टेके, आनंद कांबळे, निलेश बीडकर, अनिल दांगट, विकास केंद्रे, जयश्री ढाकरे यांनी ही कारवाई केली.