पुणे : तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड प्रकरणात सहकारनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सात जणांना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी निलंबित केले होते. सहकारनगर पोलीस ठाण्यापाठोपाठ आता वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी शनिवारी रात्री दिले. सहकारनगर आणि वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेच्या निरीक्षकांसह निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

वारजे भागात वाहनांची तोडफोड झाल्याची घटना नुकतीच घडली हाेती. तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून वारजे पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक (सध्या नेमणूक सायबर पोलिस ठाणे) डी. एस. हाके, तत्कालीन पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल, यशवंत पडवळे, जर्नादन होळकर, पोलिस नाईक सचिन कुदळे, अमोल भिसे यांना पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी शनिवारी रात्री निलंबित केले. कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा >>> सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकाची ८९ लाखांची फसवणूक

वारजे भागात टोळक्याने काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली होती. या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी टोळीप्रमुख पपुल्या ऊर्फ दिग्विजय वाघमारे (वय १९, रा. वारजे माळवाडी), राहुल वांजळे (वय २४, रा. अहिरेगाव), मारोती टोकलवाड (वय १९, रा. वारजे), हर्षद ऊर्फ बाब्या संतोष वांजवडे (वय १९, रा. वारजे) यांना अटक करण्यात आली होती. मोक्का कारवाईनंतर आरोपीा पसार झाले होते. त्यांच्यावर वेळीच कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हाके यांची सायबर पोलिस ठाण्यात आणि बागवे यांची विशेष शाखेत नुकतीच बदली करण्यात आली होती. बदली होताच दाेघांना निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात आदेश आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Story img Loader