पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जागा वाटप अद्यापही जाहीर झालेले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील बैठकीत सात जागांबाबतची चर्चा करण्यात आली. यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सात जागांसंदर्भात चर्चा झाली असली, तरी निवडणुकीसाठी चार जागा मिळतील, असे संकेत अजित पवार यांनी दिले असून येत्या गुरुवारी (२८ मार्च) जागा वाटप आणि उर्वरीत नावे जाहीर केली जातील, असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांची पुण्यातील बोट क्लब येथे बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>धुळवडीला १४२ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात; नियमभंग करणाऱ्या साडेअकराशे वाहनचालकांवर कारवाई

बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी या सात लोकसभेच्या जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, छगन भुजबळ नाशिक मधून निवडणूक लढविण्यास आग्रही आहेत. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल. सातारा लोकसभेच्या जागेवरूनही महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. मात्र भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना समजून सांगतील. त्यामुळे त्या जागेवरूनही वाद होणार नाही. बारामतीमधून कोण उमेदवार असेल हे ही गुरुवारी स्पष्ट होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने

अजित पवार म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ तीन जागा मिळत असल्याचा गैरसमज पसरविला जात असून प्रत्यक्षात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही गैरसमज नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित जागा मिळणार आहेत. जागा वाटपाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे जागांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा मुंबईत गुरुवारी केली जाईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांनी एकूण ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे योग्य प्रकारे जागा मिळाव्यात, अशी त्यांची भूमिका होती. त्यावर एकत्रित बसून मार्ग काढला. शिवसेनेनने जिंकलेल्या काही जागांवर सध्या ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षित जागा मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना एका लोकसभा मतदारसंघाची, तर आमदारांना एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक आमदाराबरोबर पाच ते सहा सदस्य असतील आणि महायुतीच्या उमेदवारांबरोबर समन्वय साधण्याचे काम केले जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven seats for ncp for the upcoming lok sabha elections pune print news apk 13 amy