पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत सात हजार दुबार मतदार असल्याचे पडताळणीत निदर्शनास आले आहे. या मतदारांना दुबार ओळखपत्रही देण्यात आल्याची हरकत माजी नगसेविका सीमा सावळे यांनी घेतली आहे. ही दुबार नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी त्यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी तयार केली. ६ ऑगस्ट २०२४ रोजी ती यादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदार यादीवर हरकत आणि सूचनेसाठी १९ ऑगस्ट अखेरची मुदत होती. यादीच्या तपासणीत अत्यंत गंभीर त्रुटी आढळल्याचे सावळे यांनी सांगितले. दोन, तीन किंवा चार वेळा नोंदणी असलेल्या मतदारांकडे वेगवेगळ्या क्रमांकांची स्वतंत्र ओळखपत्रेही आहेत. त्यामुळे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद बनली आहे.
हेही वाचा >>>पिंपरी : अनाथ अल्पवयीन मुलावर निवासी संस्थेतील कर्मचार्याकडून लैंगिक अत्याचार, आळंदीतील घटना
प्रारूप यादीमध्ये काही मतदारांची नावे, त्याच यादीत दुबार नोंदविलेले आहेत. अशा मतदारांना दुबार ओळखपत्रसुद्धा देण्यात आलेली आहेत. काही मतदारांची नावे लगतच्या भागातील इतर मतदार यादीत देखील नोंदविले असून त्याठिकाणी देखील मतदारांकडे दुबार ओळखपत्र देण्यात आलेली आहेत. दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी सावळे यांनी केली.
मतदारांची दुबार नावे असल्याबाबत हरकत आली आहे. त्याची पडतळणी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मतदार नोंदणी अधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.