पिंपरी-चिंचवड शहरात सलग दोन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे महापालिकेचा नियोजनशून्य कारभार चव्हाटय़ावर आला आहे. पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून सांडपाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार शहरात विविध ठिकाणी झाले आहेत. पवना नदीतील पाण्याची पातळी वाढली असून वाढत्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन नदीकाठ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवार-रविवार, असे दोन दिवस शहरात संततधार सुरू आहे. सोमवारी ऊनपावसाचा खेळ सुरू होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे महापालिकेचे नियोजन कसे फोल आहे, याची प्रचिती आली आहे. पवनेची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील रहिवाशांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चिंचवडगावातील मोरया मंदिराच्या मागील बाजूला पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. नदीपात्रालगतच्या भागात असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये पाणी शिरण्याची चिन्हे आहेत. जुन्या काळात खोल भागात बांधण्यात आलेल्या अनेक इमारतींमध्ये पाणी साचले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. रस्त्यावरच पाणी साचल्याचे मोरवाडी, शंकरवाडी, लालटोपीनगर भागात दिसून आले. त्याचप्रमाणे, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावरच ते पाणी साचू लागले आहे. फुगेवाडी, शाहूनगर आदी भागात झाडे उन्मळून पडली आहेत. पाऊस सुरू होताच वीज खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने सर्व विभागांशी संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पावसाळ्यात एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा या विभागांचा एकमेकांशी समन्वय नसल्याचे चित्र पुढे आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा