चिं.वि. जोशी यांच्या कथेवरील दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रकट मुलाखत आणि कबीरांचे तत्त्वज्ञान उलगडणारा सांगीतिक आविष्कार अशा कार्यक्रमांनी यंदाचा पुलोत्सव रंगणार आहे.
आशय सांस्कृतिक आणि पु. ना. गाडगीळ सन्स यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुलोत्सवाची कार्यक्रमपत्रिका महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. चिं. वि. जोशी यांच्या नात अलका जोशी-मांडके आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे सतीश कुबेर या वेळी उपस्थित होते.
८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते एम. ई. एस गरवारे सभागृहात २३ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर कृतज्ञता सन्मान दिला जाणार आहे. डॉ. हमीद व मुक्ता दाभोलकर हा सन्मान स्वीकारतील. २४ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे एलकुंचवार लिखित व ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या हिंदी नाटकाची ध्वनिचित्रफीत दाखवली जाईल. तसेच ११.३० वाजता एलकुंचवार यांच्या रचनाकृतींवर आधारित ‘मौनराग’ या नवीन चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिरात एलकुंचवार यांना ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात येईल. या वेळी संजय आर्वीकर एलकुंचवार यांची मुलाखत घेणार आहेत. रात्री ८.३० वाजता श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘दू आणि मी’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे २५ तारखेला सकाळी १० ते २ या वेळात मन्ना डे आणि शं. ना. नवरे यांच्यावरील लघुपटांचे तसेच फिल्म इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चार निवडक लघुपटांचे सादरीकरण होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिरात चिं. वि. जोशी यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून ‘आठवणीतले चिं. वि.’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येईल. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार या वेळी उपस्थित राहतील. तसेच ६ वाजता मिरासदार यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर बाबासाहेबांची मुलाखत सुधीर गाडगीळ घेतील. याच दिवशी सायंकाळी ८.३० वाजता संत कबीरांच्या रचनांवर आधारित ‘सुनो भाई साधो’ या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. डॉ. अनिल अवचट कबीरांच्या रचनांवर भाष्य करणार आहेत.
चिं. वि. जोशी यांच्या कथेवरील पु. ल. देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला आणि दामुअण्णा मालवणकर यांच्या सादरीकरणाने नटलेला ‘नवे बिऱ्हाड’ हा एकपात्री लघुपट तसेच चिंविंच्या कथेवरील ‘लग्न पाहावं करून’ व ‘सरकारी पाहुणे’ हे चित्रपट २६ तारखेला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सकाळी १० ते ४ या वेळात पाहता येतील. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिरात पु. ल. आणि व. पु. काळे यांच्या साहित्यकृतींवरील ‘वपुल’ हा कार्यक्रम सादर केला जाणार असून त्यानंतर ९१ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते प्रसिद्घ अभिनेते पुष्कर श्रोत्री, गिरीश कुलकर्णी व गायिका बेला शेंडे आदींना तरुणाई सन्मान प्रदान करण्यात येतील. या समारंभानंतर मिलिंद फाटक या कलाकारांशी संवाद साधणार आहेत.
या महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका टिळक स्मारक येथील तिकीट खिडकीवर सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळात उपलब्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा