पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहून, किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात काहीसे ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कर्नाटक ते विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे.
हेही वाचा >>> राज्यातून द्राक्ष निर्यातीला वेग; अनुकूल वातावरणामुळे उच्चांकी निर्यातीचा अंदाज
पुढील पाच-सहा दिवस पूर्व विदर्भवगळता राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात गारठा कमी झाला आहे. दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले किमान तापमान पुन्हा ११ अंश सेल्सिअसवर गेले आहे. शुक्रवारी जळगावात सर्वांत कमी किमान ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. २६ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहून, हवेत गारठा कायम राहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.