गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीयू) किरकिटवाडी येथील सार्थक लॉजवर छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणले. या लॉजमधून दोघांना अटक करून आठ युवतींची सुटका केली असल्याची माहिती एएचटीयूचे प्रमुख आणि वरिष्ठ निरीक्षक संजय निकम यांनी दिली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. आरोपींविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल ऊर्फ गोटय़ा महाले (रा. सिंहगड रस्ता, ता. हवेली) आणि तारा श्रीपती पोतदार (वय २८ सध्या रा. सिंहगड रस्ता, मूळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अजय मुंडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महिला आणि बालकांच्या अनैतिक वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणी १२ कक्षाची स्थापना केली असून त्यांची हद्दही वाढविली आहे.
किरकिटवाडी येथील सार्थक लॉजमध्ये आरोपी अजय मुंडे आणि कपिल ऊर्फ गोटय़ा महाले हे राज्यातील आणि परराज्यातील मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती एएचटीयूमध्ये नेमणुकीस असलेले गणेश जगताप यांना मंगळवारी मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त प्रसाद हसबनीस, संजय निकम, सहायक निरीक्षक नीता मिसाळ यांच्यासह पोलिसांच्या पथकाने मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सार्थक लॉजवर छापा टाकला. तेथे आरोपी महाले आणि पोतदार यांच्यासह आठ युवती आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींना अटक करून युवतींची सुटका केली.
आरोपी तारा पोतदार हा मुलींच्या वेश्याव्यवसायाचे व्यवस्थापन करीत होता. तर, कपिल महाले आणि मुंडे यांच्या अधिपत्याखाली हा व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती उघड झाली आहे. सुटका करण्यात आलेल्या मुली या दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील आहेत. त्यांची रेस्क्यू होममध्ये रवानगी करण्यात आली असून आरोपींविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा