बीडच्या पोलिस शिपाई ललिता साळवे यांच्या जननेंद्रियावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर लिंग बदल म्हणजे नेमके काय, यामध्ये शरीर रचनेमध्ये कोणते बदल होतात, अविकसित जननेंद्रियांमुळे होणारे परिणाम आदी बाबींबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर लिंगबदल शस्त्रक्रिया म्हणजे काय आणि अनुषंगिक प्रश्नांचा घेतलेला वेध..
मानवी लैंगिकतेचे शारीरिक लिंग, लिंगभाव, सामाजिक भूमिका, लैगिंक कल आणि लैंगिक भूमिका हे पाच घटक आहेत. या घटकांमधून प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र लैंगिकता घडते.
शारीरिक लिंग
वैद्यकीयदृष्टय़ा मानवी शरीराचे गुणसूत्र आणि शरीररचना या दोन माध्यमातून लिंग ठरविले जाते. मुलाच्या शरीररचनेमध्ये वृषण, लिंग ही बाह्य़जननेंद्रिये तर पुरुष बीजवाहिन्या, वीर्यकोष ही आंतरजननेंद्रिये असतात. मुलाच्या प्रत्येक पेशीमध्ये लिंग गुणसूत्र असतात. मुलीच्या शरीररचनेमध्ये योनीमार्ग, शिश्निका, योनीमार्ग ही बाह्य़जननेंद्रिये तर गर्भाशय, स्त्री बीजवाहिन्या, स्त्री बीजांड ही आंतरजननेंद्रिये असतात. मुलीच्या प्रत्येक पेशीमध्ये लिंग गुणसूत्र असतात.
जननेंद्रियातील वेगळेपण
काही जणांच्या जननेंद्रियामध्ये वेगळेपणा असतो. स्त्रियांमध्ये योनीमार्गाचा अभाव असणे, पुरुषांमध्ये मूत्रमार्गाचे मुख लिंगाच्या शिश्नमुंडावर नसणे, मुलांचे एक किंवा दोन्ही वृषण वृषणकोषात उतरलेले नसणे ही काही उदाहरणे आहेत. क्वचित काही बालकांमध्ये मुलगा आणि मुलगी या दोन्हींची जननेंद्रिये काही प्रमाणात विकसित झालेली असतात. अशा परिस्थितीमध्ये बालकाला मुलगा म्हणावे की मुलगी ठरविणे अवघड असते. अशा बालकांना इंटरसेक्स म्हणतात.
लिंग पडताळणी
क्वचितवेळा बालकामध्ये मुलगा किंवा मुलीची जननेंद्रिये विकसित न झाल्याने मुलगा की मुलगी हा गोंधळ निर्माण होतो. सोनोग्राफी चाचणीद्वारे हे लगेचच पडताळता येते. बालकाच्या शरीरामध्ये गर्भाशय असल्यास ती मुलगी आहे हे नक्की होते. तसेच गुणसूत्राच्या चाचणीवरूनही बालकाचे शारीरिक लिंग ओळखता येते.
जननेंद्रियातील वेगळपणा दूर करणाऱ्या शस्त्रक्रिया
जननेंद्रियातील वेगळपणा शस्त्रक्रियेद्वारे दूर करता येतात. उदाहरणार्थ, मुलांचे वृषण वृषणकोषामध्ये उतरलेले नसेल तर शस्त्रक्रिया करून खाली उतरवली जातात.
लिंगभाव
लिंगभाव म्हणजे व्यक्ती स्वत:ला पुरुष समजते की स्त्री. शारीरिक लिंगाप्रमाणे मानसिक लिंगही असते. बहुतांश वेळा पुरुषांचे मानसिक लिंग हे पुरुषाचे असते, तर स्त्रीचे मानसिक लिंग हे स्त्रीचे असते. काही जणांमध्ये शारीरिक आणि मानसिक लिंग समान नसते. काही मुलांचे शारीरिक लिंग पुरुषाचे असले तरी मुलगी बनण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे काही मुलींनाही शारीरिक लिंग स्त्रीचे असले तरी लिंगभाव मुलाचा असतो
लिंगबदल शस्त्रक्रिया
ज्या व्यक्तींचा शारीरिक आणि मानसिक लिंगभाव समान नसतो अशा व्यक्तींवर ऐच्छिक शारीरिक लिंग प्राप्त करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केल्या जातात.
पुरुषांमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया
ज्या पुरुषांना स्त्री बनण्याची इच्छा असते, अशा पुरुषांच्या शरीरातील लिंग, वृषण, वीर्यकोष शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढले जातात आणि योनी तयार केली जाते. काहीवेळा कृत्रिम स्तनही बसविले जातात. व्यक्तीवर हार्मोन्सची तसेच छातीवर किंवा चेहऱ्यावरील केस येऊ नये यासाठी देखील उपचार केले जातात. शस्त्रक्रियेनंतर योनीचा वापर संभोगासाठी करता येतो, मात्र गर्भाशय, स्त्रीबीजवाहिन्या व स्त्रीबीजांडे नसल्याने या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही.
स्त्रियांमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया
ज्या स्त्रियांना पुरुष बनण्याची इच्छा असते, अशा स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजांड, गर्भाशय व स्त्रीबीजवाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात येते. तसेच स्तनही काढले जातात. स्त्रीच्या शरीरामध्ये दोन वृषण बसविले जातात. कृत्रिमरित्या लिंगही तयार केले जाते. वृषणामध्ये पुरुषबीज तयार होत नाहीत. लिंगातून मूत्रविर्सजन केले जाते परंतु लिंगाला नैसर्गिकदृष्टय़ा उत्तेजना येत नाहीत. पुरुषांप्रमाणे दाढी, मिशी येण्यासाठी केश रोपणही केले जाते. व्यक्तीला हार्मोन्सची उपचार पद्धती दिली जाते.
(संकलन-शैलजा तिवले)