शहराच्या मध्यवर्ती सदाशिव पेठ येथील एका विद्यार्थी वसतिगृहाच्या रेक्टरने या वसतिगृहातील ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रेक्टरला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
मोरेश्वर महादेव काणे (वय ६०, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या रेक्टरचे नाव आहे. या संदर्भात मुलाच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली.
काणे हा या वसतिगृहाचा रेक्टर आहे. पीडित मुलगा या वसतिगृहामध्ये राहतो. काणे याने या मुलाला त्याच्या कार्यालयात बोलावून त्याच्याशी लैंगिक चाळे केले. हा प्रकार मुलाने सुरुवातीला कोणाला सांगितला नाही. आजारी पडल्याचे त्याने सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घरी नेले. तेथे त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. त्यानंतर त्याने घरच्यांना रेक्टरने केलेला प्रकार सांगितल्यावर कुटुंबीयांनी रेक्टरविरोधात तक्रार दाखल केली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. बी. पाटील पुढील तपास करीत आहेत.
रेक्टर मोरेश्वर काणे याला विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांना सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी बाकी असून अधिक तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी आणि सरकारी वकील लीना पाठक यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार काणे याला २३ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.