राज्यातील दुष्काळी स्थिती व आर्थिक मंदीच्या वातावरणाचा फटका पाडव्याच्या मुहूर्तावरील वाहन खरेदीलाही बसला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीमध्ये ४० ते ५० टक्क्य़ांनी घट झाल्याचे चित्र असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अपेक्षित वाहनांची नोंद न झाल्याने या कार्यालयाच्या उत्पन्नालाही मोठा फटका बसला आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची खरेदी केली जाते. हे लक्षात घेऊन वाहन उत्पादक कंपन्यांपासून वितरकांपर्यंत दुचाकी व चारकाची वाहनांच्या विक्रीसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. त्याचप्रमाणे काही वितरकांकडून वाहन खरेदी करणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तूही दिल्या जातात. प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही या कालावधीत सज्ज राहावे लागते. वाहन खरेदी केल्यानंतर त्याची आरटीओकडे नोंद करून व क्रमांक टाकूनच वाहन घरी नेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे पाडव्यापूर्वी वाहन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून व त्यानंतर दोन-तीन दिवसांत क्रमांक मिळवून पाडव्याच्या दिवशी वाहन घरी नेले जाते.
यंदा राज्याच्या विविध ठिकाणी दुष्काळाची स्थिती आहे. त्याचप्रमाणे बाजारातही मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार ही शक्यता खरी ठरली. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये पाडव्याच्या दोन ते तीन दिवस आधीच वाहन नोंदणीसाठी सज्जता ठेवण्यात आली होती. मात्र, मागील वर्षांच्या तुलनेत वाहनांची नोंदणी कमी प्रमाणात झाली. परिवहन कार्यालयाकडे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे पाचशे चारचाकी व १६०० दुचाकींची नोंद झाली. मागच्या वर्षांत सुमारे ९०० ते १००० चारचाकी व तब्बल तीन हजार दुचाकींची नोंद झाली होती. हा आकडा पाहता यंदा वाहनांच्या नोंदणीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून येते. मागील वर्षी पाडव्याच्या कालावधीत वाहनांच्या नोंदणीमधून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा कसेबसे एक कोटी रुपयांपर्यंत नव्या नोंदणीचे उत्पन्न पोहोचू शकले.