पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली असतानाच संभाव्य उमेदवार असलेले शैलेश टिळक यांनी कसबा विधानसभेसाठी, तर अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज नेले. या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नसतानाही अर्ज नेण्यात आल्याने या दोघांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाली आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची सात फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. कसबा आणि चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षामधील अनेक इच्छुक आहेत. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनी उमेदवारीचा दावा केला आहे, तर चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी तसेच बंधू शंकर या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. भाजप उमेदवारी कोणाला देणार यावर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे निश्चित होणार आहे. भाजपनेही कसबा आणि चिंचवडमधील इच्छुक उमेदवारांची नावे प्रदेश समितीला पाठविली असून केंद्रीय निवड समितीकडून येत्या दोन दिवसांत उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच शैलेश टिळक आणि अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने या दोघांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.