गेली वीस वर्षे ज्यांच्यासमवेत मतदान करत होतो, त्या मुक्तताईंची उणीव भासली, असे सांगताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक मतदानानंतर भावूक झाले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचंड मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास टिळक यांनी व्यक्त केला.
शैलेश टिळक यांनी मुलगा कुणाल टिळक आणि मुलगी चैत्राली टिळक यांच्यासमवेत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा येथे मतदान केले. त्यानंतर टिळक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा- लंडनहून थेट कसब्यातील मतदान केंद्रावरच!
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक होत आहे. नंतरच्या टप्प्यावर महापालिका आणि नंतर लोकसभा निवडणूक होणार असल्याने ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची झाली आहे. संघटनात्मक बांधणीमुळे भाजप उमेदवाराचा विजय होईल, असा विश्वास शैलेश टिळक यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत युवा मतदार सक्रिय झाला आहे. भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असे कुणाल टिळक यांनी सांगितले.