मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला रविवारी (२२ जानेवारी) २८५ वर्षे पूर्ण होत आहेत. २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झालेल्या शनिवारवाडय़ाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला १६ हजार १२० रुपये खर्च आला होता.
पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन २२ जानेवारी १७३२ रोजी वाडय़ाची वास्तुशांत झाली, त्या दिवशीही शनिवार होता. वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. हा वाडा शनिवार पेठेमध्ये असल्याने त्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवले गेले, अशी माहिती इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी दिली.
शिवराम कृष्ण लिमये ऊर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले. बाजीरावांचा महाल, सदर, दफ्तरखाना, फडणीस-चिटणीसांचा फड, जवाहिरखाना आणि भुयाराची विहीर असे शनिवारवाडय़ातील पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाले होते. पूर्वी पेशव्यांचे कुटुंब लहान होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यामुळे वाडय़ाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत वाडय़ाला तटबंदी करण्याचे ठरविले. मात्र, पुण्यामध्ये पेशव्यांनी कोट बांधला तर सिंहगडाला शह बसेल अशी भूमिका घेत सचिवांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे तटबंदीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश आले. मात्र, नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन वाडय़ावर शत्रूकडून घातपाती कृत्ये तसेच हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन तटबंदी उभारण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर परवानगी मिळाली आणि पायाच्या दगडकामावर विटांचे बांधकाम करून तटबंदी उभारण्यात आली, असेही बलकवडे यांनी सांगितले.
शनिवारवाडय़ाची वैशिष्टय़े
शनिवारवाडय़ाच्या पूर्वेकडील बुरुजाच्या दरवाज्यापाशी गणपतीची स्थापना केल्यामुळे हा गणेश दरवाजा झाला. त्याचे मुख कसबा गणपतीच्या दिशेने आहे. वाडय़ाच्या सगळ्यात शेवटी मुख्य म्हणजे दिल्ली दरवाजा बांधला गेला. दिल्लीजिंकण्याचे ध्येय असल्याने त्याचे प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. महत्त्वाच्या मोहिमांसाठी पेशवे रवाना होत असत तेव्हाच हा दिल्ली दरवाजा उघडला जात असे, असे पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.