Shankar Jagtap And Sunil Shelke : भाजपचे शंकर जगताप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. चिंचवड च्या जनतेने शंकर जगताप यांना १ लाख ३ हजार आणि मावळ च्या जनतेने आमदार सुनील शेळके यांना १ लाख ८ हजार मताधिक्याने विजयी केले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघ हा लक्षवेधी ठरला. मावळ विधानसभा निवडणुक एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळालं. चिंचवड विधानसभा मतदार संघाची ही परिस्थिती काही वेगळी नाही.
चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये भाजपचे शंकर जगताप विरुद्ध शरद पवार गटाचे राहुल कलाटे अशी थेट लढत होती. राहुल कलाटे यांच्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी कंबर कसली. मित्र राहुल कलाटे यांच्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याचबरोबर शरद पवार यांचा रोड -शो देखील घेण्यात आला होता. तरीदेखील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी राहुल कलाटे यांना नाकारत भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी केलं.
हेही वाचा…‘ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात; पराभवानंतर वडगाव शेरीतील उमेदवार आक्रमक
एक लाख तीन हजारांचे मताधिक्य मिळवून दिलं. दुसरीकडे मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके यांच्या पुढे त्यांच्याच पक्षातील बंडखोर बापू भेगडे यांच आव्हान होतं. भेगडे यांना भाजपमधून माजी राज्यमंत्री बाळ भेगडे यांनी पाठिंबा दिला होता. मावळ मधील अवघी भाजप शेळके यांच्या विरोधात होती. असं असताना सुनील शेळके यांनी बाजी मारली. मावळ मधील जनतेने सुनील शेळके यांना एक लाख आठ हजारांच्या मताधिक्याने विजयी केल आहे. मावळ मधील लक्षवेधी ठरलेल्या या विधानसभेच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होतं. एकूणच चिंचवड आणि मावळ मधील दोन्ही महायुतीच्या उमेदवारांनी लाखांचा पल्लागाठत विजयश्री खेचून आणली आहे.