लोकसत्ता प्रतिनिधी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य मंदिरातील उत्सवमूर्तींची पाकाळणी, पूजा-अभिषेक झाल्यावर सकाळी अकरा वाजता उत्सवमुर्ती सनई-चौघड्याच्या निनादामध्ये नवरात्र महालात आणण्यात आल्या. यावेळी ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. नवरात्र महालात धार्मिक वातावरणात खंडोबा-म्हाळसा देवीच्या मुर्तीची घटस्थापना करण्यात आली. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी आणि मंगेश खाडे यांनी पौरोहित्य केले.

हेही वाचा >>>दिल्ली साहित्य संमेलनाचे शरद पवार स्वागताध्यक्ष

देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, अनिल सौंदडे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, पुजारी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, चेतन सातभाई, बाळासाहेब दीडभाई, देवल बारभाई, मल्हार बारभाई, धनंजय आगलावे, हनुमंत लांघी, समीर मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गडावर मार्तंडविजय ग्रंथाचे पारायण, मल्हारीसहस्त्रनाम याग होणार आहे. गुरुवारी (५ डिसेंबर) देवदिवाळी उत्सवानिमित्त नवरात्र महालात फराळाचा रुखवत मांडला जाणार असुन शुक्रवारी (६ डिसेंबर) रात्री खंडोबा देवाला तेलवण करुन हळद लावली जाणार आहे.

हेही वाचा >>>Rohit Pawar : विधानसभेतील अपयशानंतर शरद पवार मोठा निर्णय घेणार? रोहित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “शंभर टक्के…”

उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असुन ऎतिहासिक गडाला नेत्रदीपक विद्युत रोषणाई केल्याने सारा गड उजळला आहे. सोमवारी सकाळपासून खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

खंडोबाचे षडरात्रोत्सव

खंडोबा भक्तांच्या घरात चंपाषष्ठीनिमित्त घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेपासून जसे देवीचे नवरात्र असते त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्य़ंत सहा दिवस खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठीला देवाचे घट उठवले जातात,यावेळी पुरणपोळी आणि वांग्याचे भरीत-रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. मणिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने या काळात मार्तंड भैरवाचा अवतार घेतल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या उत्सवाला महत्त्व आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankaracharya inaugurates ghatsthapana at khandoba fort in jejuri pune print news vvk 10 amy