शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी कालवश
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे लढवय्ये नेते, शेतीतील अर्थतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ, शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. जोशी यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा आधारवड हरपला आहे. जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोपोडी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी, १५ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाजपेयी सरकारच्या कालखंडात शरद जोशी राज्यसभेचे खासदार होते. संसदेमध्ये जात असताना पायरीवरून त्यांचा पाय घसरला. तेव्हा त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्या अपघातापासूनच शरद जोशी यांची प्रकृती वयोमानापरत्वे त्रास देत होती. तरीही ते सातत्याने आंदोलनात सहभाग घेत असत. अगदी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनातही जोशी सहभागी झाले होते. ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या खास आग्रहास्तव चाकण आणि सज्जनगड येथे कार्यक्रम झाला होता. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे त्यांची शेती आणि घर आहे. बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर देवी हाइट्स येथे सध्या त्यांचे वास्तव्य होते. शरद जोशी यांचे निकटवर्तीय म्हात्रे सर आणि अनंतराव देशपांडे हे शरद जोशी यांची त्यांच्या आजारपणादरम्यान काळजी घेत होते. जोशी यांच्या दोन्ही कन्या श्रेया शहाणे आणि डॉ. गौरी जोशी या सध्या परदेशात आहेत. त्या उभयता सोमवारी, १४ डिसेंबरला  पुण्यात येतील. त्यानंतरच जोशी यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यसंस्काराचे ठिकाण आज, रविवारी जाहीर केले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी पुण्यात येण्याची घाई करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील-हंगरगेकर यांनी केले आहे.
उच्चशिक्षित शरद जोशी यांनी वेगवेगळ्या अधिकार पदांवर काम करीत संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (युनो) झेप घेतली होती. संयुक्त राष्ट्रसंघात काम करताना त्यांनी जगातील शेतकरी आणि भारतातील शेतक ऱ्यांची स्थिती याचा तुलनात्मक अभ्यास केला. भारत सरकारची शेतक ऱ्यांबद्दलची धोरणं आणि त्यामुळे त्यांची झालेली दैन्यवस्था पाहून ते अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतूनच त्यांनी तडकाफडकी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते भारतात परतले. १९७९ मध्ये त्यांनी शेतक ऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतल्या. प्रसंगी सरकारला धोरणे बदलण्यास भाग पाडले. त्यांनी मांडलेली ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही संकल्पना क्रांतिकारी ठरली. शरद जोशी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर शेतकरी संघटनेत मतभेद झाले. जोशी यांच्या तालमीत तयार झालेल्या राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील या शेतकरी नेत्यांनी स्वत:च्या वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या. मात्र शरद जोशी अन्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. राजकारणाच्या मुद्दय़ावर जोशी यांची साथ सोडलेल्या नेत्यांनी स्वत:च राजकारणाचा मार्ग अवलंबला. विधिमंडळ आणि संसदेच्या सभागृहात शेतकरी प्रश्नांसंदर्भात हिरिरीने भूमिका मांडणारे नेते शेतकरी संघटनेच्या मुशीतूनच तयार झाले हे शरद जोशी यांचे यश आहे.

संस्थात्मक कार्य
संस्थापक-अध्यक्ष : कृषी योगक्षेम संशोधन न्यास, चाकण शिक्षण मंडळ, शिवार अ‍ॅग्रो प्रॉडक्टस लि., भामा कन्स्ट्रक्शन्स लि. १९९४ मध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना. देशाची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा आणि त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा.
स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार. जुलै २००४ ते जुलै २०१० या कालखंडात राज्यसभेवर नियुक्ती.
ल्लल्ल
विशेष पदनियुक्ती
’केंद्र सरकारच्या स्थायी कृषी सल्लागार समितीचे अध्यक्ष (१९९०-९१), कॅबिनेट दर्जा
’राष्ट्रीय कृषी नीतीचा मसुदा
’राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य
’स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य (१९९७)
’केंद्र सरकारच्या कृषीविषयक कार्यबल अध्यक्ष (सप्टेंबर २००० ते जुलै २००१), कॅबिनेट दर्जा
’जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनीती. विशेषत: कृषी नीती कशी असेल याची शिफारस करणारा अहवाल करण्यामध्ये योगदान
’२००४ ते २०१० या कालावधीत संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य.
’१९९९ पासून अमेरिकेतील सेंट लुईच्या जागतिक कृषी मंच सल्लागार मंडळाचे सदस्य.
’अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार या विषयांवरील परिसंवाद, परिषदांसाठी नियमित निमंत्रित व्याख्याते.
ल्लल्ल
लेखन-संपादन
’शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र ‘साप्ताहिक वारकरी’चे संपादक
’‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाचे हिंदूी, गुजराती, कन्नड आणि तेलगू या भाषांमध्ये भाषांतरे
’‘लोकसत्ता’, ‘बिझनेस इंडिया’,
‘द हिंदूू’, ‘संडे’, अशा दैनिके आणि नियतकालिकांमध्ये नियमित लेखन.
’शेतकरी संघटनेच्या ‘शेतकरी संघटक’ या पाक्षिक मुखपत्रासाठी सलग २८ वर्षे लेखन आणि ‘आठवडय़ाचा ग्यानबा’ या साप्ताहिकासाठी दोन वर्षे लेखन.
तिसऱ्या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून ‘शरद जोशींचा विचार आणि त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?

‘इंडिया-भारत’ १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या शोषणाची इंग्रज सरकारची वसाहतिक नीती सुरूच ठेवली. त्यामुळे देशातील जनतेमध्ये आधी आर्थिक आणि अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक द्वैत तयार झाले. हे द्वैत अधोरेखित करणाऱ्या ‘इंडिया-भारत’ या संकल्पनेचे उद्गाते.
ल्लल्ल
विकसित देशांत शेती सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांना भरघोस अनुदाने दिली जातात. भारतात मात्र, शेतकऱ्यांना उणे अनुदान दिले जाते. हे सिद्ध केले.

पुरस्कार
’सातारा येथील रा. ना. गोडबोले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०१० मध्ये सातारा भूषण पुरस्कार
’‘अंगारमळा’ या पुस्तकासाठी २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार
’‘अ‍ॅग्रिकल्चर टुडे’ मासिकातर्फे २००८ मध्ये पहिला अ‍ॅग्रिकल्चर लीडरशिप अ‍ॅवॉर्ड
’मुंबई येथील चतुरंग प्रतिष्ठानतर्फे २०११ मध्ये चतुरंग जीवनगौरव पुरस्कार

शरद अनंत जोशी
’जन्म : ३ सप्टेंबर १९३५
’जन्मस्थान : सातारा
’वडील : स्व. अनंत नारायण जोशी
’आई : स्व. इंदिरा अनंत जोशी
’पत्नी : लीला (१९४३-१९८२)
’कन्या : श्रेया शहाणे (कॅनडा) आणि डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)
’शिक्षण : प्राथमिक – रजपूत विद्यालय, बेळगाव
’माध्यमिक : रुंगठा हायस्कूल, नाशिक आणि पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले, मुंबई<br />’एस. एस. सी : १९५१
’बी. कॉम. : १९५५, सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई
’एम. कॉम. : १९५७, सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई
’सुवर्णपदक : बँकिंग विषयासाठी सी. रँडी सुवर्णपदक
’आयपीएस : आयपीएस (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण १९५८
’खासदार : २००४ ते २०१० राज्यसभा सदस्य
ल्लल्ल
’कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र विषयाचे अधिव्याख्याता १९५७-५८
’भारतीय टपाल सेवेमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी १९५८-६८, पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक म्हणून सहभाग
’व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे या मूलभूत उद्देशासाठी काम
’९ ऑगस्ट १९७९ रोजी
चाकण येथे शेतकरी संघटनेची स्थापना
’‘शेतमालाला रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी लढा. कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात आणि कापूस या पिकांसाठी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व. त्यासाठी उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे आणि अधिवेशने
’३१ मे १९८२ रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या अराजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना
’महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये शेतकरी आंदोलने आणि स्त्री प्रश्नांची मांडणी
’चांदवड (जि. नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनाला सुमारे दोन लाख महिलांची उपस्थिती होती.
’स्त्रीशक्ती जागरणामध्ये स्त्री-पुरुष मुक्ती
’शेतकरी महिला आघाडीची स्थापना
’महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
’महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी
’‘लक्ष्मीमुक्त’ अभियानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे त्यांनी १९८८ मध्ये शेतकरी पुरुषांना आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १९९१ पर्यंत जवळपास लाखभर महिलांची नावे जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर नोंदविली गेली.
’दारू दुकानबंदी आंदोलन
’पंचायत राज्य बळकाओ आंदोलन
ग्रंथसंपदा

’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
’प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
’चांदवडची शिदोरी- स्त्रियांचा प्रश्न
’शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
’स्वातंत्र्य का नासले?
’खुल्या व्यवस्थेकडे- खुल्या मनाने
’अंगारमळा
’जग बदलणारी पुस्तके
’अन्वयार्थ – १ आणि २
’माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
’बळीचे राज्य येणार आहे
’अर्थ तो सांगतो पुन्हा
’पोशिंद्याची लोकशाही
’फक्त भारतासाठी
’राष्ट्रीय कृषिनीती
इंग्रजी ग्रंथसंपदा
’अ‍ॅन्सिरग बिफोर गॉड
’द वुमन्स क्वेश्चन
’भारत आय व्ह्य़ू
’भारत स्पिक्स आऊट
’डाऊन टू अर्थ
शेतकऱ्यांवरची सावलीच हरवली!

गरिबी हटविण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य देणारी अर्थव्यवस्था हवी. शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण, सरकारी खर्च मर्यादित व्हावा, असे विचार संघटनेने मांडले. शरद जोशी म्हणत, ‘प्राइज’, ‘टेक्नॉलॉजी’ व ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी स्वत:चा विकास करून दाखवतील. स्वामिनाथन अहवालातून हाच विचार मांडण्यात आला आहे. शेतीचा विकास हा उत्पादन किती वाढते, यापेक्षा उत्पन्न किती वाढते, यावर अवलंबून असल्याचे त्यात भाष्य केले आहे. खर्चावर ५० टक्के नफा जोडून भाव ठरविण्याची बाब शरद जोशींनी पूर्वीच अधोरेखित केली होती. माझे त्यांच्याशी मतभेद सरकारी धोरणाच्या अनुषंगाने झाले. वैचारिक मतभेद झाले, पण त्यांचे मोठेपण कायम माझ्या मनात स्थिरावले होते. एकूण व्यवस्थेत शेतकऱ्यांना अग्रपातळीवर आणण्याचे काम त्यांनीच केले. विद्यमान व्यवस्थेत शेतकऱ्यांची लूट होते. ही भांडवलशाही व्यवस्था चुकीचीच आहे. हा त्यांचा विचार नवा नव्हता, पण या विचारांमागे संघर्षांची ताकद प्रथम शरद जोशी नावाच्या वादळानेच उभी केली, हे इतिहास विसरणार नाही. ऊस, कांद्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद जोशींना त्यांच्या संघर्षांत खरी साथ दिली ती विदर्भ-मराठवाडय़ातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी! आज या शेतकऱ्यांवरची सावलीच हरवली आहे.
ल्लविजय जावंधिया,
शेतकरी संघटनेचे पाईक, वर्धा.

शेती प्रश्नांवरील आंधळेपण दूर केले

शेती प्रश्नांवरील माझा आंधळेपणा शरद जोशींमुळे दूर झाला. महात्मा फुले यांच्यानंतर शरद जोशींनी शेतकऱ्यांना शोषणाची जाणीव करून दिली. ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण’ हे ब्रीद त्यांनी रूढ केले. ‘गरिबी हटाओ’ असे म्हटले जाते. मात्र, गरिबी टिकावी आणि ती वाढावी यासाठी जे प्रयत्न केले जातात. ते थांबवले तरी गरिबी हटू शकते. भारतातील गरिबी ही कोरडवाहू शेतीमधून आली आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. कामगारांच्या शोषणातून भांडवलाची निर्मिती होते, हा मार्क्‍सचा सिद्धांत आहे. मात्र, लुझेंबर या तत्त्वज्ञाच्या पावलावर पाऊल ठेवून शरद जोशी यांनी कच्च्या मालाच्या शोषणातून भांडवलाची निर्मिती होते, हे शेतकऱ्यांच्या गळी उतरवले. त्यापूर्वी डावे शेतकऱ्यांना मालकाच्या भूमिकेतील खलनायक समजायचे, तर उजवे त्यांना क्षुद्र समजायचे. शेतकऱ्यांची गरिबी गेल्या जन्माचे पाप असल्याचे उजव्या विचारसरणीचे लोक ठसवायचे.
या पाश्र्वभूमीवर शरद जोशी यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आत्मभान आणि तत्त्वज्ञान दिले. त्यांच्याशी नंतरच्या काळात मतभेद होऊन अनेकजण चळवळीतून बाहेर पडले. मात्र, त्यांचे ऐतिहासिक कार्य त्यांचे विरोधकही विसरू शकणार नाही.
ल्लचंद्रकांत वानखेडे ,
सामाजिक कार्यकर्ते

अभ्यासू नेता गमावला
शेतकऱ्यांचे प्रश्न संघर्षांतून हिरिरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेविषयी जागतिक व्यासपीठावर मार्गदर्शन करणारा आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा लढाऊ आणि अभ्यासू नेता आपण गमावला आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी, यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांनी मांडलेले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील आणि वचनबद्ध असेल.
ल्लदेवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील शेती आता अगदी संकटात असताना शरद जोशी यांच्यासारखा एक द्रष्टा नेता आपल्यातून जाण ही गोष्ट महाराष्ट्रासाठी चांगली नाही.हा माणूस खरा ग्लोबल होता. खरा उदारमतवादी होता. महाराष्ट्राने या माणसाच्या कर्तृत्वाला खरी दाद दिलीच नाही अस मला फार खेदानं म्हणावस वाटत. येत्या काळात शेती आणि त्या संदर्भातील प्रश्नांना भिडताना आपल्याला त्यांची उणीव कायमच भासत राहील.
राज ठाकरे</p>

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त करण्याची प्रतीज्ञा त्यांनी घेतली होती. शेतीच्या कर्जमुक्तीचे स्वप्न या युगपुरुषाने बघितले होते. मात्र, काळाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विडा उचलणारा त्यांचा नेताच हिरावून नेला आहे. देशाचा व महाराष्ट्राचा दौरा करतांना शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे दु:ख स्वत: बघितले होते. त्यामुळे शेती व्यवसाय फायद्याचा करण्यासाठी शेतमालाला रास्त भाव मिळावे म्हणून चार दशकांपासून त्यांची लढाई सुरू होती.
अ‍ॅड. वामनराव चटप

ज्या देशात पालक आपल्या शाळेतल्या मुलांना शंभराची नोट पॉकेटमनी म्हणून देतात तो ‘इंडिया’ आणि चवली हरवली तर अंधारातही म्हातारी शोधत राहते तो ‘भारत’. – शरद जोशी, १९८०

Story img Loader