शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी कालवश
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे लढवय्ये नेते, शेतीतील अर्थतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ, शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. जोशी यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा आधारवड हरपला आहे. जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोपोडी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी, १५ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाजपेयी सरकारच्या कालखंडात शरद जोशी राज्यसभेचे खासदार होते. संसदेमध्ये जात असताना पायरीवरून त्यांचा पाय घसरला. तेव्हा त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्या अपघातापासूनच शरद जोशी यांची प्रकृती वयोमानापरत्वे त्रास देत होती. तरीही ते सातत्याने आंदोलनात सहभाग घेत असत. अगदी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनातही जोशी सहभागी झाले होते. ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या खास आग्रहास्तव चाकण आणि सज्जनगड येथे कार्यक्रम झाला होता. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे त्यांची शेती आणि घर आहे. बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर देवी हाइट्स येथे सध्या त्यांचे वास्तव्य होते. शरद जोशी यांचे निकटवर्तीय म्हात्रे सर आणि अनंतराव देशपांडे हे शरद जोशी यांची त्यांच्या आजारपणादरम्यान काळजी घेत होते. जोशी यांच्या दोन्ही कन्या श्रेया शहाणे आणि डॉ. गौरी जोशी या सध्या परदेशात आहेत. त्या उभयता सोमवारी, १४ डिसेंबरला पुण्यात येतील. त्यानंतरच जोशी यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यसंस्काराचे ठिकाण आज, रविवारी जाहीर केले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी पुण्यात येण्याची घाई करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील-हंगरगेकर यांनी केले आहे.
उच्चशिक्षित शरद जोशी यांनी वेगवेगळ्या अधिकार पदांवर काम करीत संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (युनो) झेप घेतली होती. संयुक्त राष्ट्रसंघात काम करताना त्यांनी जगातील शेतकरी आणि भारतातील शेतक ऱ्यांची स्थिती याचा तुलनात्मक अभ्यास केला. भारत सरकारची शेतक ऱ्यांबद्दलची धोरणं आणि त्यामुळे त्यांची झालेली दैन्यवस्था पाहून ते अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतूनच त्यांनी तडकाफडकी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते भारतात परतले. १९७९ मध्ये त्यांनी शेतक ऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतल्या. प्रसंगी सरकारला धोरणे बदलण्यास भाग पाडले. त्यांनी मांडलेली ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही संकल्पना क्रांतिकारी ठरली. शरद जोशी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर शेतकरी संघटनेत मतभेद झाले. जोशी यांच्या तालमीत तयार झालेल्या राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील या शेतकरी नेत्यांनी स्वत:च्या वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या. मात्र शरद जोशी अन्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. राजकारणाच्या मुद्दय़ावर जोशी यांची साथ सोडलेल्या नेत्यांनी स्वत:च राजकारणाचा मार्ग अवलंबला. विधिमंडळ आणि संसदेच्या सभागृहात शेतकरी प्रश्नांसंदर्भात हिरिरीने भूमिका मांडणारे नेते शेतकरी संघटनेच्या मुशीतूनच तयार झाले हे शरद जोशी यांचे यश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा