शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार शरद जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (१५ डिसेंबर) वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शरद जोशी यांचे शनिवारी (१२ डिसेंबर रोजी) दीर्घ आजाराने बोपोडी येथील निवासस्थानी निधन झाले. श्रेया शहाणे आणि डॉ. गौरी जोशी या शरद जोशी यांच्या दोन्ही कन्या परदेशामध्ये वास्तव्यास असतात. त्या दोघी आल्यानंतर मंगळवारी जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, श्रेया आणि गौरी या दोघी पुण्यामध्ये आल्या असून जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
शरद जोशी यांचे वडील, त्यांच्या मातोश्री आणि त्यांची पत्नी म्हणजे आमची आई या तिघांवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले होते. हे ध्यानात घेऊन जोशी यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हा निर्णय आम्ही आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असल्याचे श्रेया आणि गौरी यांनी सांगितले. या दोघींनी नदीपात्रात ज्या ठिकाणी जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणाला भेट दिली. शेतकरीनेते पाशा पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत या वेळी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे देशभरातील कार्यकर्ते व नागरिक यांना अंत्यदर्शन घेता यावे यासाठी जोशी यांचे पार्थिव भिडे पुलाजवळील पुलाची वाडी परिसरातील नदीपात्रातील मैदान येथे मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत ठेवण्यात येणार आहे. संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चळवळीशी संबंधित व्यक्ती तसेच नागरिकांना या वेळात अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी सव्वादोन वाजता जोशी यांची अंत्ययात्रा भिडे पूल येथून सुरू होणार असून लक्ष्मी रस्त्याने अलका-टिळक चौकमार्गे वैकुंठ स्मशानभूमी येथे जाणार आहे. तेथे दुपारी तीन वाजता जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्रेया शहाणे आणि डॉ. गौरी जोशी यांनी दिली.
शेतकरी कर्जमुक्त होणे हीच बाबांना खरी श्रद्धांजली
शेतीप्रधान देशातही गरीब असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख पाहून बाबांना दु:ख होई. सर्वासाठी धान्य पिकवितो, तोच उपाशी राहतो हे पाहून ते अस्वस्थ होत. त्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठीच बाबांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकरी कर्जमुक्त होऊन त्यांना पोटभर अन्न मिळणे हीच बाबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना श्रेया शहाणे आणि गौरी जोशी यांनी सोमवारी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा