स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांना स्थान मिळावे यासाठी आयुष्य वेचणारे, शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते आणि संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी (वय ८०) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्रेया शहाणे आणि डॉ. गौरी जोशी या शरद जोशी यांच्या दोन्ही कन्या सध्या परदेशात असून त्या सोमवारी (१४ डिसेंबर) परतणार आहेत. त्यानंतरच जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (१५ डिसेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी पुण्याकडे येण्याची घाई करू नये. शरद जोशी यांच्या पार्थिवावर कधी आणि कोठे अंत्यसंस्कार होणार हे रविवारी (१३ डिसेंबर) संध्याकाळी जाहीर केले जाणार आहे, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील-हंगरगेकर यांनी सांगितले.
वाजपेयी सरकारच्या कालखंडात शरद जोशी राज्यसभेचे खासदार होते. संसदेमध्ये जात असताना २००४-५ मध्ये पायरीवरून त्यांचा पाय घसरला. तेव्हा त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्या अपघातापासूनच शरद जोशी यांची प्रकृती वयोमानापरत्वे त्रास देत होती. प्रकृती पुरेशी साथ देत नसतानाही सातत्याने ते आंदोलनात सहभाग घेत असत. अगदी एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या खास आग्रहास्तव चाकण आणि सज्जनगड येथे कार्यक्रम झाला होता. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे त्यांची शेती आणि घर आहे. बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर देवी हाईट्स येथे सध्या त्यांचे वास्तव्य होते. शरद जोशी यांचे निकटवर्तीय म्हात्रेसर, अनंतराव देशपांडे हे शरद जोशी यांची काळजी घेत होते. शरद जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोपोडी येथील निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव खासगी रुग्णालयाच्या शीतगृहामध्ये ठेवण्यात आले आहे.
उच्चशिक्षित शरद जोशी यांनी वेगवेगळ्या अधिकार पदांवर काम करीत संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (यूनो) झेप घेतली होती. संयुक्त राष्ट्रसंघात काम करताना त्यांनी जगातील शेतकरी आणि भारतातील शेतक ऱ्यांची स्थिती याचा तुलनात्मक अभ्यास केला. भारत सरकारची शेतक ऱ्यांबद्दलची धोरणं आणि त्यामुळे त्यांची झालेली दैन्यावस्था पाहून ते अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतूनच त्यांनी तडकाफडकी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते भारतात परतले. १९७९ मध्ये त्यांनी शेतक ऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतल्या. प्रसंगी सरकारला धोरणे बदलण्यास भााग पाडले. त्यांनी मांडलेली ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही संकल्पना क्रांतिकारी ठरली. शरद जोशी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर शेतकरी संघटनेत मतभेद झाले. जोशी यांच्या तालमीत तयार झालेल्या राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील या शेतकरी नेत्यांनी स्वत:च्या वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या. मात्र, शरद जोशी अन्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. राजकारणाच्या मुद्दय़ावर जोशी यांची साथ सोडलेल्या नेत्यांनी स्वत:च राजकारणाचा मार्ग अवलंबला. विधिमंडळ आणि संसदेच्या सभागृहात शेतकरी प्रश्नांसंदर्भात हिरिरीने भूमिका मांडणारे नेते शेतकरी संघटनेच्या मुशीतूनच तयार झाले हे शरद जोशी यांचे यश आहे.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन
शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते आणि संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी (वय ८०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
Written by दिवाकर भावे
आणखी वाचा
First published on: 13-12-2015 at 03:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad joshi passed away