पवार काका-पुतण्यांचे परस्परांशी कसे संबंध आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात नेहमीच तर्कवितर्क मांडले जातात. पिंपरीचा कारभार अजितदादांकडे सोपविला, तेव्हापासून शरद पवार येथील राजकारणात लक्ष देत नाहीत. शुक्रवारी अपवादात्मक परिस्थितीत भोसरीत दोघेही एका व्यासपीठावर आले, तेव्हा शहराच्या विकासकामांचे ‘प्रगतिपुस्तक’ अजितदादांनी ‘साहेबां’पुढे मांडले, तर शहराचा कायापालट झाल्याचे श्रेय देत पवारांनी अजितदादांचे भरभरून कौतुक केले.
गेल्या काही वर्षांपासून विशेषत: ‘उद्योगनगरी’ बारामती लोकसभेतून वगळल्यानंतर अजित पवार हेच पिंपरी पालिकेचा कारभार पाहात आहेत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी पालिकेत सलग दोन वेळा राष्ट्रवादीने एकहाती सत्ता हस्तगत केली. याच सत्तेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे शहराचे चित्र बदलले आहे. गेल्या काही वर्षांतील कामांची जंत्रीच अजितदादांनी शरद पवार यांच्यापुढे मांडली. भव्य रस्ते, उड्डाण पूल, उद्याने, स्टेडियम, रुग्णालये इथपासून ‘बेस्ट सिटी’ ते स्वच्छ शहराच्या प्रवासातील छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची माहिती देत भविष्यातील नियोजनाची सविस्तर माहिती अजितदादांनी भाषणात दिली. त्यानंतर शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या जनतेने आपल्याला सात वेळा निवडून दिल्याची आठवण सांगितली. अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे यांनी शहराची पायाभरणी केल्याचे सांगत गेल्या काही वर्षांत शहराचे रूपरंग पालटले. पुण्यापेक्षाही पिंपरीत अधिक सुविधा मिळू लागल्या. पुण्यातील अराजकीय मंडळी आम्हाला पिंपरीच्या जवळपास तरी न्या, अशी विनंती करू लागले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कधी येथून चाललो तर कुठे आलो, ते समजत नाही. इतका बदल झाला आहे. अजितमुळे पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलला असून देशातील चांगल्या शहरांच्या यादीत शहराचे नाव समाविष्ट झाल्याचे पवारांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा