पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथील गोविंदबागेमध्ये भेट घेतली. ‘आमच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली. पण, ती इथे सांगणे योग्य नाही. राजकारणात काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागतात. सर्व नियोजन उघडे केले तर समोरच्याला माहिती पडेल’, असे वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले.
बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी वडेट्टीवार शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) रात्रीपासून शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी होते. सकाळी नऊच्या सुमारास वडेट्टीवार यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अध्र्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मात्र, चर्चेचा तपशील समजू शकला नाही. त्यानंतर पवार यांच्यासमवेत वडेट्टीवार यांनी कृषी विकास केंद्राच्या इन्क्युबेशन सेंटरला भेट दिली.वडेट्टीवार म्हणाले, की शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीतील पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. बारामती येथे एका कार्यक्रमासाठी आलो असल्याने पवार यांची भेट घेतली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची मती भ्रष्ट झाली असून, अनेक चुकीची पावले उचलली जात आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>संभाजीराजे छत्रपती का म्हणाले?… ‘मराठा आरक्षण हा सोपा विषय नाही!’
राज्यातील सत्ताधारी आमदार स्वत:चा मतदारसंघ वाचविण्यासाठी धडपड करतो आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी नव्हे, तर आपला जीव वाचवावा, अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. पुरोगामी महाराष्ट्रात जात-धर्मावरून तेढ निर्माण होणे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. पण, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आगीत तेल ओतण्यमचे काम कोणी करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.सत्तेतील लोक दोन्ही समाजाला सांभाळत आहेत. राज्यात २८ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सर्वाना ओबीसीमध्ये घेणार का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये जातवार जनगणना करावी आणि लोकसंख्येनुसार ज्याचा वाटा त्याला द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.