पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर घराणेशाहीचा गंभीर आरोप केला. तसेच शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या, असा टोला लगावला. यानंतर आता शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “सगळ्या राज्यांचं चित्र हेच स्पष्ट करतं की, भाजपा त्यांची सत्ता असलेली राज्ये संभाळू शकली नाही आणि बहुतांश राज्ये त्यांच्या हातात नाहीत. अशा परिस्थितीत उद्या देशाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभणार नाही अशी वक्तव्ये केली.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केलं. ते मत व्यक्त करताना त्यांनी मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटलं. खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर तीनवेळा संसदेत निवडून गेली आहे. एखाद्यावेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते, पण दुसरी, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “शरद पवारांच्या मुलीचं भलं…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, म्हणाले, “राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा…”

“मोदींनी काहीही सांगितलं तरी कर्तुत्व असल्याशिवाय मतदार नेहमी मत देत नाही”

शरद पवार पुढे म्हणाले, “संसदेतील कामगिरीत सुप्रिया सुळेंनी ९८-९९ टक्के हजेरी लावली आणि अधिकाधिक सहभाग नोंदवला. त्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे, उच्च दर्जाचा आहे. संसदेच्या कामाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सुप्रिया सुळेंना आठवेळा पुरस्कार दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वतःचं कर्तुत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमी मत देत नाही. एखाद्यावेळी मत देऊ शकतो.”

हेही वाचा : विरोधकांकडून केवळ घोटाळय़ांची हमी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; विरोधी ऐक्याची खिल्ली

“मोदींनी असं वक्तव्य करणं अशोभनीय आहे”

“म्हणूनच मोदींनी असं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असं मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. अशावेळी संसदीय सदस्य हीदेखील संस्था आहे हे लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar answer all allegations of pm narendra modi in pune pbs
First published on: 29-06-2023 at 16:39 IST